BJP RSS Gen Z Strategy : लय झालं मंदिर-मशीद आणि हिंदू-मुस्लिमचं राजकारण. आता विषय बदललाय…. नवीन पोरं आलीत– जेन झी…. यांना ना जुन्या काळचं राजकारण पटत, ना राम मंदिराच्या नावावर मतं मागितलेलं आवडत. संघ आणि भाजपला हा सिन एकदम परफेक्ट कळालाय. म्हणूनच त्यांनी आपला गेम प्लॅन पूर्ण चेंज केलाय. आता फक्त भाषण ठोकून जमणार नाही, तर लॉजिकच्या भाषेत बोलावं लागणार आहे. हाच भाजप आणि आरएसएसचा नवा अजेंडा आहे, भाजपा आणि RSS जेन झी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आता राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीवर सोशल मोहोम चालू केलीये, काय आहे हि मोहीम ? आता पुन्हा मंदिर मशीद आणि हिंदुत्वाच राजकारण चालेल का ? तरुण पिढीला नक्की काय हवंय ? आणि भाजपा यासाठी काय काय करतंय ?
जेन झी मतदारांचा बदलता दृष्टिकोन; पारंपरिक राजकारणाला आव्हान ( BJP RSS Gen Z Strategy )
सगळ्यात आधी विषय काय आहे माहितीये का? ही जी नवीन पिढी आहे ना, ती इंटरनेटच्या स्पीडवर वाढलीये. यांच्या हातात मोबाईल आहे आणि डोक्यात प्रश्न आहेत. जुन्या पिढीसारखं कुणीतरी नेत्याने स्टेजवरून सांगितलं आणि पोरांनी टाळ्या वाजवल्या, तो जमाना आता गेला. या पोरांना प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक पाहिजे असतं. तुम्ही जर त्यांना म्हणालात की देश धोक्यात आहे, तर हे पोरगे लगेच गुगल करून डेटा मागणार. सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः कबूल केलंय की, आजच्या पोरांना फक्त ऑर्डर्स दिलेले आवडत नाहीत, त्यांना डिस्कशन पाहिजे असतं. आणि जर तुम्ही त्यांच्याशी संवाद नाही साधला, तर मग पेपर लीक आणि बेरोजगारीवरून जंतर-मंतरवर जो राडा झाला, तसला संताप बाहेर येतो. तो संताप शांत करण्यासाठीच आता ही नवी रणनीती आखली गेलीये.
आता मूळ मुद्द्यावर येऊ. भाजप आणि संघाला कळून चुकलंय की, राम मंदिराचा विषय आता सेटल झालाय.. आता त्यावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. पोरांना मंदिराबद्दल आदर आहे, पण इतरही विकासकामांचा विषय आहे, हे त्यांना चांगलंच माहितीये. त्यांना पाहिजेत नोकऱ्या, चांगलं शिक्षण आणि पारदर्शक परीक्षा. त्यामुळे भाजपने आता भावनिक मुद्द्यांवरून थेट प्रॅक्टिकल मुद्द्यांवर शिफ्ट मारायला सुरुवात केलीये. देशातल्या ३५ वर्षांखालील तरुणांची मोठी फौज २०२९ च्या निवडणुकीत गेम फिरवणार आहे. टार्गेट २०२९ डोळ्यासमोर ठेवूनच संघाचे मोठे नेते आता पोरांच्या कट्ट्यावर पोहोचायला लागलेत.
हेही वाचा : नसरापूरनंतर भंडाऱ्यात संतापजनक घटना! तीन वर्षीय मुलीवरील अत्याचार;
तरुणांना नोकऱ्या, शिक्षण, डिजिटल संवाद आणि विकासाचे आश्वासन; 2029 निवडणुकीसाठी भाजप-RSS ची नवीन तयारी
RSS ची स्टाईल तर एकदम बदललीये.. पूर्वी शाखा म्हणजे हाफ पँट, काठी आणि कडक शिस्त असायची. पण आजचा आयटीतला पोरगा किंवा स्टार्टअप करणारा तरुण तसा शाखेत जाणार नाही. म्हणून संघाने आपली पीआर स्टाईल बदलली. आता ते आयटी प्रोफेशनल्स आणि कॉलेजच्या मुलांसाठी स्पेशल कन्सर्ट आणि कॉन्फरन्स घेत आहेत. मुंबईतल्या आयआयएमयूएन कार्यक्रमात सरसंघचालकांनी २००० हून अधिक जेन झी पोरांशी वन-टू-वन संवाद साधला. तिथे त्यांनी हिंदुत्वाच्या व्याख्या नाही सांगितल्या, तर देशाची लोकशाही, ग्लोबल लीडरशिप आणि एआय सारख्या विषयांवर एकदम पोरांच्या भाषेत गप्पा मारल्या. RSS आता तरुणांना सांगतोय की, देशासाठी काहीतरी भारी करणं, स्टार्टअप उभा करणं हाच खरा राष्ट्रवाद आहे.
दुसरीकडे भाजपची सोशल मीडिया टीम…. टीव्हीवरच्या मोठ्या जाहिराती आणि नेत्यांची भाषणं आता जेन झी पाहतच नाही. ते जगतात फक्त इन्स्टाग्राम रील आणि युट्यूब शॉर्ट्सवर. म्हणून आता भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी खूप एडिट केलेले व्हिडिओ बनवणं बंद केलंय. एकदम रॉ आणि ऑथेंटिक कंटेंट बनवायचा, कॅमेरा पकडायचा आणि बोलायचं. भाषा पण एकदम साधी, हिंग्लिश किंवा आजच्या पोरांना समजेल अशी डिजिटल भाषा.
यातली सगळ्यात खतरनाक चाल म्हणजे पीअर-टू-पीअर एम्बेसेडर्स. म्हणजे काय? तर पोरांना राजकारण्यांपेक्षा स्वतःच्या वयाच्या युट्युबर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सचं बोलणं जास्त पटतं. हे ओळखून भाजपने देशभरातल्या टॉप डिजिटल क्रिएटर्सना आपल्या बाजूने करायला सुरुवात केलीये. नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स त्याचाच भाग होता. जेव्हा तुमचा आवडता इन्फ्लुएन्सर सरकारच्या एखाद्या स्कीमबद्दल रील बनवतो, तेव्हा तो राजकीय प्रचार वाटत नाही, तर मित्राने दिलेला सल्ला वाटतो. हीच ती छुपी रणनीती आहे, जी पोरांच्या डोक्यात विचार रुजवतेय.
हेही वाचा : शिवसेना पक्ष-चिन्ह वादात सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; कपिल
तरुण आणि डिजिटल युगातल्या चेहऱ्यांची एन्ट्री ( BJP RSS Gen Z Strategy )
पण, हा रस्ता एवढा सोपा पण नाहीये. जेन झी पब्लिक एकदम कडक आहे. तुम्ही पेपर लीक थांबवण्यासाठी फक्त कायदा केला तर ते ऐकणार नाहीत, प्रत्यक्षात परीक्षा नीट झाल्या पाहिजे, तरच ते मत देणार. बेरोजगारीचा आकडा फक्त भाषणात कमी दाखवून चालणार नाही, तो जमिनीवर दिसला पाहिजे. हा धोका भाजपला पण माहितीये. म्हणूनच ते फक्त वरवरचा प्रचार करत नाहीयेत, तर आपल्या पक्षात पण मोठे बदल करायला लागलेत. येणाऱ्या काळात भाजपच्या मोठ्या पदांवर तुम्हाला वयस्कर नेत्यांपेक्षा तरुण आणि डिजिटल युगातल्या चेहऱ्यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
राजकारण म्हटलं कि धार्मिक ध्रुवीकरण, जात पात, धर्म यांचा सर्रास वापर होत होता, निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक मुद्यांना जात महत्व दिलं जात होतं, पण जेन झी पोरांनी या सर्वांना फाट्यावर मारलंय आणि केवळ विकासाच्या, हक्कांच्या मुद्द्यावर आता चर्चा व्हायला पाहिजे असं पोरांनी सांगून टाकलंय, त्यामुळे पुढच्या निवडणुकीत हे धार्मिक मुद्दा चालणार नाही हे भाजप आणि RSS ला कळून चुकलंय…
थोडक्यात काय तर, RSS आणि भाजपने हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा बदलून त्याला ग्लोबल इंडियन आयडेंटिटीचा नवा लूक दिलाय. पोरांना ते सांगतायेत की, भावांनो, तुम्ही मॉडर्न राहा, तंत्रज्ञान वापरा, जगात नाव कमवा, पण आपली संस्कृती आणि देशाची माती विसरू नका. जुन्या काळच्या हिंदू-मुस्लिम आणि घोषणाबाजीच्या राजकारणाला पूर्णपणे टाटा-बायबाय करून, आता लॉजिक, विकास आणि डायरेक्ट संवादाचा हा नवा गेम सुरू झालाय, ज्याचा रिमोट कंट्रोल जेन झीच्या हातात आहे….




