MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात MPSC मधील तीन अधिकारी आणि अन्य तीन जण अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, दोन परीक्षार्थींमधील वाद आणि त्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती देण्यात आली आहे.
परीक्षेच्या निकालानंतर वादाला सुरुवात ( MPSC Paper Leak )
पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणाचा धागा एका परीक्षार्थी आणि तिच्या परिचितातील वादापर्यंत पोहोचला. नंदुरबारमधील एका कोचिंग क्लासशी संबंधित प्रवीण पाटील याच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप परीक्षार्थी ऋतुजा पाटीलच्या वडिलांवर आहे.
ही प्रश्नपत्रिका ऋतुजाने तिच्या मित्राला, गौरव पाटीलला दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऋतुजा पात्र ठरली, मात्र गौरव परीक्षेत अपयशी ठरला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर गौरवने MPSCकडे ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केल्याचे समोर आले. त्याने नंतर तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तोपर्यंत प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.
हेही वाचा : शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 374 अंकांनी कोसळला,
MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत
या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये MPSCचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते, तसेच नंदुरबारमधील कोचिंग क्लास संचालक प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पेपर लीक प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत कशा पोहोचल्या, याचाही तपास केला जात आहे.
औषध निरीक्षक भरती परीक्षेचा घटनाक्रम काय?
MPSCने 29 जुलै 2025 रोजी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. त्यावेळी 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर 1 ते 22 जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यात 488 उमेदवार सहभागी झाले.
मात्र, परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. 27 जुलै 2026 रोजी MPSCने मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात परीक्षेपूर्वी किमान एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय समोर आला. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली आणि आयोगाने 25 ऑगस्ट 2026 रोजी औषध निरीक्षक गट-ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता या प्रकरणात प्रश्नपत्रिका नेमकी कुठून लीक झाली, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि किती उमेदवारांना त्याचा फायदा झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.









