Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा; बनावट प्रमाणपत्रांद्वारे पुणे पोलिस दलात 19 जणांची भरती
Pune

5 टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा; बनावट प्रमाणपत्रांद्वारे पुणे पोलिस दलात 19 जणांची भरती

Pune Police Recruitment Scam
38
Pune Police Recruitment Scam: पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून तब्बल १९ उमेदवारांनी पोलिस दलात नोकरी मिळवल्याचा आरोप आहे.

राज्य सरकारकडून खेळाडूंसाठी लागू असलेल्या ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरमार्गाने फायदा घेतल्याचा आरोप आहे. ‘कुराश’ या पारंपरिक कुस्तीच्या तसेच ‘ड्रॅगनबोट’ या सामूहिक नौकानयनाच्या खेळांची बनावट प्रमाणपत्रे (Fake Sports Certificates) तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ च्या भरती प्रक्रियेत १९ उमेदवारांनी नोकरी मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे.  (Pune Police Fake Certificate Case)

दोन आरोपींना अटक

अंकुश विठ्ठल नागर (४०) – महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष, रा. चंडीगड; मूळ रा. अहिल्यानगर.
शिवाजी साळुंखे (४६) – महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे सचिव, रा. फुरसुंगी.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: ‘वाइब’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये सोहाचा कुणालवर कौतुकाचा वर्षाव; सांगितली पतीची मजेशीर किस्से

आणखी आरोपी रडारवर

या प्रकरणात परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख, इतर जिल्ह्यांचे संघटक तसेच अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ( Pune Latest News )

२०१६ ते २०२६ दरम्यानचा बनावट कारभार?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार २०१६ ते २०२६ या कालावधीत घडल्याचा संशय आहे. कोणतीही अधिकृत स्पर्धा न घेता बनावट कागदपत्रे आणि क्रीडा अभिलेख तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

भरतीच्या वेळी सादर केली प्रमाणपत्रे

शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान संबंधित उमेदवारांनी ही प्रमाणपत्रे सादर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

१९ पैकी ९ उमेदवार प्रशिक्षणाला

तपासादरम्यान १९ उमेदवारांपैकी ९ जण पोलिस प्रशिक्षणासाठी रवाना झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिस आणि क्रीडा विभागातील काहीजण सहभागी?

या संपूर्ण प्रकारात पोलिस दलातील तसेच क्रीडा विभागातील काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यापासून ते भरती प्रक्रियेत ती स्वीकारली जाण्यापर्यंत नेमकी साखळी काय होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

तपासाला वेग

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

क्रीडा आरक्षणाच्या माध्यमातून पात्र खेळाडूंना मिळणाऱ्या संधीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात आणखी कोणकोणाची नावे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts