Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात तब्बल ५ हजार ५३ पानांचे चार्जशीट दाखल केलंय… पोलीस तपासात अनेक नवीन धक्कादायक आणि थरारक खुलासे समोर आले आहेत. ही केवळ एक हत्या नसून थंड डोक्याने, चॅट जीपीटीचा वापर करून, क्राईम थ्रिलर सिनेमांचा अभ्यास करून आणि बनावट सोशल मीडिया अकाउंटचा ट्रॅप रचून रचलेला एक क्रूर कट होता… या संपूर्ण प्रकरणाची इनसाईड स्टोरी, पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे आणि प्रत्यक्ष मर्डर कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम पाहणार आहोत….
क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी एक सत्य घटना सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. पुण्यातील केतन अग्रवालचा लोहगडावरून पडून मृत्यू होतो. सुरुवातीला या घटनेला अपघात म्हटलं गेलं. पण जेव्हा पोलीस या अपघाताच्या मुळाशी जातात, तेव्हा समजते हा अत्यंत क्रूर आणि थंड डोक्याने केलेला खून होता.
ChatGPT आणि ऑनलाइन सर्चचा आरोपपत्रात उल्लेख
पोलिसांनी दोषारोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालची ( Ketan Agrawal ) हत्या करण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यासाठी अनेक दिवसांचे नियोजन आणि रेकी करण्यात आली होती. या कटात चेतनचा मित्र रितेश हांगे हा तिसरा मुख्य सूत्रधार म्हणून सामील झाला. सुरुवातीला त्यांनी केतनला मारण्याचा विचार केला नव्हता. पोलिसांच्या आरोपपत्रातील खुलाशानुसार, त्यांचा पहिला प्लॅन गुंडांना सुपारी देऊन केतनला गंभीर दुखापत करण्याचा आणि त्याला अपंग करण्याचा होता, जेणेकरून लग्न मोडेल. यासाठी रितेश हांगे याने बंगळुरूमधील एका मित्राच्या माध्यमातून काही लोकांशी सुपारीबाबत चर्चाही केली होती. परंतु, ज्या व्यक्तीला सुपारी देण्याचे ठरले होते, तिने ऐनवेळी या गुन्ह्यातून माघार घेतली. पोलिसांनी आता त्या सुपारी घेणाऱ्या व्यक्तीलाच या खटल्यात सर्वात महत्त्वाचा सरकारी साक्षीदार बनवलंय….
सुपारीचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर सिया गोयलने गुन्हेगारीच्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि जुन्या प्रकरणांचा अभ्यास सुरू केला. पोलिसांनी जेव्हा सियाचे मोबाईल जप्त केले आणि फॉरेन्सिक तपासणी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सियाने इंटरनेटवर मेघालयातील गाजलेल्या ‘सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी’ हत्या प्रकरणाचा अभ्यास केला होता. या प्रकरणात एका पत्नीने आपल्या पतीची हनीमूनदरम्यान दरीत ढकलून हत्या केली होती. याशिवाय, सियाने चॅटजीपीटीचा वापर करून, पोलिसांच्या तावडीतून कसे सुटावे, गुन्हा करताना कोणते पुरावे मागे सोडू नयेत आणि गुन्ह्याची योजना कशी आखावी याचे सर्चिंग केले होते. पोलीस कोठडीत महिला आरोपींना मारहाण होते का. या तांत्रिक सर्च हिस्टरीने पोलिसांना आरोपींचा हेतू सिद्ध करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मिळवून दिला.
सरप्राईजच्या बहाण्याने केतनला लोहगडावर नेल्याचा पोलिसांचा दावा ( Ketan Agrawal Murder Case )
Lohagad Murder : हत्या करण्यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली. ३१ मे रोजी सिया गोयल ( Siya Goyal ) पहिल्यांदा स्वतः लोहगडावर गेली आणि तिने कोणत्या दरीतून माणूस खाली पडल्यास वाचण्याची शक्यता कमी असते, त्या जागेची रेकी केली. त्यानंतर, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून सियाने केतनला आधीच लोहगडावर नेण्याची तालीम सुरू केली होती. अवघ्या २० दिवसांत तिने केतनला तीन वेळा लोहगडावर ट्रॅकिंगच्या बहाण्याने नेले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, १८ जूनच्या मुख्य घटनेपूर्वी, चार दिवस आधी म्हणजेच १४ जून रोजी सुद्धा सियाने केतनला त्या कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या दिवशी केतनचा नशीब बलवत्तर होते…
१४ जूनचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आरोपी अधिक सावध झाले. १७ जूनला सिया आणि चेतन पुण्याच्या एका कॅफेमध्ये भेटले. तिथे त्यांनी लोहगडाचे व्हिडिओ आणि नकाशे पुन्हा पाहिले आणि अंतिम प्लॅन निश्चित केला. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, कॅफेबाहेर पडताना या दोघांनी एकमेकांना कसे ढकलायचे, पायाला आणि खांद्याला कसा धक्का द्यायचा, याची प्रत्यक्ष रिहर्सल सुद्धा केली होती. आता प्रश्न असा होता की, केतनला पुन्हा लोहगडावर कसे आणायचे? कारण तो नुकताच तिथून जाऊन आला होता. यासाठी चेतन चौधरी आणि त्याचा मित्र रितेश हांगे यांनी एक डिजिटल ट्रॅप रचला.
त्यांनी एका अज्ञात मुलीचा फोटो वापरून इंस्टाग्रामवर ‘माही’ नावाचे एक बनावट अकाउंट तयार केलं. बनावट अकाउंटवरून केतनला मेसेज पाठवण्यात आला. मेसेजमध्ये लिहिले होते, मी सियाची खूप जवळची मैत्रीण माही बोलतेय. १८ जूनला सियाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला लोहगडावर तिला एक सरप्राईज बर्थडे पार्टी द्यायची आहे. तू सियाला काहीही न सांगता गुपचूप लोहगडावर घेऊन ये, मी तिथे आधीच पोहोचत आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीला सरप्राईज देण्याच्या आनंदात केतन या जाळ्यात पूर्णपणे अडकला. त्याने आनंदाने सियाला गाडीत बसवले आणि ते लोहगडाकडे निघाले.
हेही वाचा : UPI वर चार्जेस, राज ठाकरे संतापले आधी नोटबंदी अन् आता…!
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 5,053 पानी आरोपपत्र दाखल
१८ जूनला नक्की काय घडलं, याचा संपूर्ण पट पोलिसांनी आरोपपत्रात मांडला आहे. ठरलेल्या प्लॅननुसार, चेतन चौधरी ( Chetan Chaudhary ) हा केतन आणि सिया तिथे पोहोचण्यापूर्वीच, लोहगडाच्या एक्झिट रूटने वर पोहोचला होता. पोलिसांनी त्याचा माग काढू नये म्हणून त्याने स्वतःचा मोबाईल आपल्या ऑफिसमध्येच ठेवून दिला होता आणि त्याचे इंटरनेट सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी पावणे सहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवले होते. जेणेकरून त्याचे लोकेशन लोहगडावर दिसणार नाही. चेतनने अंगात एक हुडी घातली होती आणि डोक्यावर कॅप लावली होती, जेणेकरून त्याची ओळख पटणार नाही. केतन आणि सिया गडावर पोहोचले. सियाने गडावर येताच आजूबाजूला पाहिले आणि दबा धरून बसलेल्या चेतनला डोळ्यांनीच इशारा दिला. गडावरील दरीच्या टोकावर, जिथून खाली शेकडो फूट खोल कडा होता, तिथे सियाने केतनला थांबवले. केतन दरीच्या टोकावर निसर्गाचा आनंद घेत पूर्णपणे गाफील उभा होता.
सिया कड्याच्या एका बाजूला बसली आणि तिने केतनच्या खांद्याला धक्का दिला, आणि चेतनने लाथ मारली, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे केतनचा तोल गेला. आणि केतन खोल दरीत कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चेतन गडावरून खाली उतरला आणि जुन्या मुंबई-पुणे हायवेवर जाऊन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि पुण्याला निघून गेला. दुसरीकडे, कड्यावर उपस्थित असलेल्या सियाने आरडाओरडा करायला सुरुवात केली की, तिने रडण्याचे नाटक केले आणि पोलिसांना अपघाताची खोटी माहिती दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी केतनला अडकवण्यासाठी वापरलेले ते बनावट ‘माही’ इंस्टाग्राम डिलीट करून टाकले.
80 ते 85 साक्षीदार आणि डिजिटल पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग
स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या या तिन्ही आरोपींना वाटले होते की, त्यांनी एक परफेक्ट क्राईम केला आहे आणि पोलीस याला पावसाळ्यातील ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात समजून फाईल बंद करतील. पण पोलिसांनी सिया आणि चेतनचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले. त्यातून समोर आले की, गेल्या काही महिन्यांत या दोघांमध्ये हजारो कॉल झाले होते आणि तासनतास बोलणे झाले होते. जरी त्यांनी घटनेपूर्वी आपले व्हॉट्सॲप चॅट्स डिलीट केले होते, तरी पोलिसांनी सायबर फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्यांचे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडियावरील चॅट्स यशस्वीपणे रिकव्हर केले. या चॅट्समधून हत्येचा संपूर्ण कट आणि रितेश हांगेची भूमिका स्पष्ट झाली. हत्येनंतर १८ सप्टेंबर रोजी चेतन आणि रितेश हांगे पुण्याच्या कॅफे मध्ये भेटले होते, जिथे चेतनने रितेशला सांगितले होते की, ‘आपला प्लॅन यशस्वी झाला, केतनचा गेम फिनिश झाला आहे’. पोलिसांनी या डिजिटल पुराव्यांच्या आधारे रितेशला सुद्धा बेड्या ठोकल्या.
या केसला कोर्टात पूर्णपणे वॉटरटाईट आणि मजबूत करण्यासाठी पोलिसांनी केवळ तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून न राहता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधले. लोहगडावर ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या तीन पर्यटकांनी सिया आणि चेतनला केतनला दरीत ढकलताना प्रत्यक्ष पाहिले होते. पोलिसांनी या तीनही महत्त्वाच्या चष्मदीद साक्षीदारांचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवले आहेत, जे न्यायालयात नाकारता येत नाहीत. याशिवाय पोलिसांनी आरोपींची ओळख परेड घेतली, ज्यामध्ये या साक्षीदारांनी आरोपींना अचूक ओळखले. पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट, क्राईम सीन रिक्रिएशन आणि एकूण ८० ते ८५ विश्वासार्ह साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश या ५ हजार ५३ पानांच्या आरोपपत्रात केला आहे.
गुन्हा कितीही हुशारीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केला, तरी कायद्याचे हात गुन्हेगाराच्या मानेपर्यंत पोहोचतातच, हेच या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चॅट जीपीटी, फेक सोशल मीडिया आणि अपघाताचा बनाव रचून कायद्याला चकवा देण्याचा सिया आणि चेतनचा हा क्रूर प्रयत्न पोलिसांनी धुळीस मिळवला आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्याच्या
न्यायालयीन सुनावणीकडे लागले आहे.








