• Home
  • देश
  • India Mother of Democracy : ‘भारत ही लोकशाहीची जननी’; आम्ही मुद्द्यांवर लोकशाही पद्धतीने चर्चा करतो, पंतप्रधान मोदींचं विधान
Delhi

India Mother of Democracy : ‘भारत ही लोकशाहीची जननी’; आम्ही मुद्द्यांवर लोकशाही पद्धतीने चर्चा करतो, पंतप्रधान मोदींचं विधान

India Mother of Democracy
21
India Mother of Democracy : भारतात विविध भाषा, वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना आपली मतं मांडण्याची संधी मिळते, असं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि नवकल्पना ही २१व्या शतकातील महत्त्वाची सामर्थ्याची साधनं असल्याचंही मोदी यांनी अधोरेखित केलं.

नवी दिल्ली : भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि देशात विविध मुद्द्यांवर लोकशाही पद्धतीने चर्चा केली जाते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) नवी दिल्ली येथे आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये संबोधित करताना त्यांनी भारतातील भाषिक विविधता, प्रसारमाध्यमांचं व्यापक जाळं आणि डिजिटल माध्यमांवरील नागरिकांचा सहभाग यांचा उल्लेख केला. तंत्रज्ञानामुळे नागरिकांना एकमेकांशी जोडण्यासोबतच विविध विषयांवर आपली मतं मांडण्याची संधी मिळाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी  (PM Modi Statement) भारतातील लोकशाहीचं स्वरूप स्पष्ट करताना देशातील भाषिक आणि माध्यमविषयक विविधतेची आकडेवारी मांडली. भारतात १०० हून अधिक भाषा असून, सुमारे ८० हजार नोंदणीकृत वृत्तपत्रं आणि नियतकालिकं आहेत. याशिवाय एक हजारांहून अधिक उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या असल्याचं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुढे काय? स्पर्धा परीक्षार्थींच्या मागण्यांकडे लक्ष

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख करताना भारतात यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी ५० कोटींहून अधिक वापरकर्ते असल्याचं मोदी म्हणाले. नागरिक विविध विषयांवर उघडपणे चर्चा करतात आणि वेगवेगळे दृष्टिकोन मांडतात. या प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे केवळ लोक एकमेकांशी जोडले गेले नाहीत, तर त्यांच्यासाठी ज्ञान आणि संधींची दारंही खुली झाली आहेत, असं मोदी यांनी सांगितलं. सुमारे १२ ते १३ वर्षांपूर्वी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करण्याची क्षमता ही स्वतःमध्ये एक प्रकारची ताकद होती. मात्र, २०१४ नंतर मोबाईल डेटाचे दर परवडणारे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. यामुळे छोट्या शहरांमधील (Digital Education) विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षणाची संधी मिळू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : पंत OUT, हा २१ वर्षीय खेळाडू IN! न्यूझीलंड दौऱ्याआधी BCCI चा मोठा निर्णय; युवा विकेटकीपरची सरप्राइज एन्ट्री

डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ केवळ मोठ्या शहरांतील किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरता मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांच्या भाषणातून मांडण्यात आला. (Blumberg new economy) ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये यंदा जगभरातील बदलत्या सत्ताकेंद्रांवर, तंत्रज्ञानावर आणि आर्थिक व्यवस्थेवर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ‘पॉवर टू एम्पॉवर’ अर्थात इतरांना सक्षम करण्यासाठी सामर्थ्याचा वापर करण्याची संकल्पना मांडली.

२१व्या शतकात तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि नवकल्पना ही सामर्थ्याची प्रमुख साधनं बनली आहेत. मात्र, या सामर्थ्याचा वापर नेमका कशासाठी होतो, हे अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाचा फायदा केवळ काही लोकांना होणार की त्यातून कोट्यवधी लोकांसाठी नव्या संधी निर्माण होणार, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं मोदी म्हणाले. ज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : India GDP Growth : भारताच्या GDP बाबत मोठी बातमी! IMF ने वाढवला विकासदराचा अंदाज; पण महागाईचं आव्हान कायम

आपल्या भाषणात मोदी यांनी सामर्थ्याचा अर्थ केवळ नियंत्रण किंवा स्पर्धा असा नसून, त्यातून इतरांना सक्षम करण्याची संधी निर्माण झाली पाहिजे, असं सांगितलं. नियंत्रण ठेवण्यापेक्षा सक्षम करणं, स्पर्धेपेक्षा सहकार्य करणं आणि स्वतः यशस्वी होण्याबरोबर इतरांनाही यशस्वी होण्यास मदत करणं, हा या संकल्पनेचा गाभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ज्ञान, संपत्ती आणि शक्ती यांचं खरं मूल्य त्यांचा वापर कशासाठी केला जातो, यावर ठरतं, असा आशय असलेल्या संस्कृत सुभाषिताचाही त्यांनी संदर्भ दिला. या विचाराचा संबंध त्यांनी आजच्या तंत्रज्ञानाधारित आणि परस्परावलंबी जगाशी जोडला. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमचं आयोजन यंदा प्रथमच भारतात करण्यात आलं आहे. या मंचावर अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जागतिक घडामोडींशी संबंधित विषयांवर विविध क्षेत्रांतील नेते आणि तज्ज्ञ चर्चा करत आहेत.

हेही वाचा : Pune Air Pollution : पुण्याच्या हवेत प्रदूषणाचा विळखा! AQI वाढला; नेमकी कारणं काय?

या कार्यक्रमात मोदी यांनी भारताच्या (Digital Growth) डिजिटल विकासाचा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला. भारताची क्षमता इतर देशांसाठीही विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी उपयोगी पडली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावायची असेल, तर तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा वापर व्यापक विकासासाठी करणं आवश्यक आहे, हा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts