• Home
  • ताज्या बातम्या
  • गांजा घेऊन निघाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले! शिक्रापुरात दोघे जेरबंद; २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune

गांजा घेऊन निघाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले! शिक्रापुरात दोघे जेरबंद; २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Shikrapur Ganja Seizure
40
शिरूर । सचिन धुमाळ, प्रतिनिधी

Shikrapur Ganja Seizure: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. तळेगाव ढमढेरे–शिक्रापूर रस्त्यावरील (Shikrapur Ganja Seizure) त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि. १३) सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत १ किलो ९०२ ग्रॅम गांजा आणि पल्सर दुचाकीसह तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या (Shikrapur Crime) आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ( Pune Crime News )

गुप्त माहिती मिळाली अन् पोलिसांनी आखली व्यूहरचना

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित संपतराव मांजरे यांना मंगळवारी पहाटे गुप्त बातमीदारामार्फत लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर पंचांसह पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयित दुचाकीची प्रतीक्षा सुरू केली.

हेही वाचा: Maharashtra SIR 2026: मोठी बातमी! SIR-2026 मध्ये तांत्रिक गोंधळ; महाराष्ट्रातील 2.70 लाख मतदारांच्या नोंदी अखेर दुरुस्त

सकाळी सुमारे ८.४० वाजता संबंधित दुचाकी घटनास्थळी येताच पोलिसांनी दोन्ही बाजूंनी मार्ग रोखला आणि दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दुचाकीची तपासणी केली असता हँडलला अडकवलेल्या पांढऱ्या पिशवीत चिकटपट्टीने गुंडाळलेले गांजाचे गाठोडे आढळून आले. तपासणीत प्लास्टिक पिशवीसह गांजाचे वजन १ किलो ९०२ ग्रॅम भरले. (Maharashtra Crime News)

या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा आणि ५० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी जप्त केली. अशा प्रकारे एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

सागर हरिभाऊ घुमरे (वय २२, रा. खालुंब्रे, ता. खेड; मूळ रा. आरोळेवस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि मनीषकुमार मर्निकात प्रसाद सिंग (वय २८, रा. बेगुसराय, बिहार) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

गांजा कुठून आला? पुढे कोणाला पुरवठा होणार होता?

जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कोणाला पुरविण्यात येणार होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात केवळ वाहतूक करणाऱ्यांपुरतेच प्रकरण मर्यादित आहे की त्यामागे आणखी मोठी पुरवठा साखळी आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २० आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख करीत आहेत.

हेही वाचा: काही निर्णय ठरतील गेमचेंजर? १४ ऑक्टोबरला ‘या’ राशींनी राहावं सतर्क!

पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्रापूर परिसरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

परिसरात संशयास्पद व्यक्ती, हालचाली किंवा गुन्हेगारी प्रकार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ११२ किंवा ७०७४१००११२ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोळी, उमाकांत कुंजीर, पंडित मांजरे तसेच पोलीस अंमलदार योगेश आव्हाड, विकास बांगर, नागेश वाघमारे, शरद धुरपते आणि आत्माराम तळोदे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts