Elon Musk Starlink India : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि स्पेस-एक्सचे मालक एलोन मस्क यांनी सोशल मीडियावर एक अशी पोस्ट केली, ज्याने भारतातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवून दिली. मस्क यांनी थेट भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधत विचारले,’काय अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत? एवढ्यावरच न थांबता, त्यांनी अंबानींना उपरोधिकपणे पंतप्रधान अंबानी असं म्हटलं…. मस्क यांच्या या विधानामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. आणि दोन गट पडले कुणी विरोध केला तर कुणी समर्थन केलं…. मस्क यांनी एवढा मोठा वाद का निर्माण केला? त्यांच्या या संतापामागे नेमकी कोणती व्यावसायिक खेळी आहे? आणि भारताने मस्क यांच्या विरोधात एवढी आक्रमक भूमिका का घेतली आहे?
एलोन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्यात वाद का झाला? ( Elon Musk vs Ambani )
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे स्टारलिंक ही मस्क यांची सॅटेलाइटद्वारे इंटरनेट पुरवणारी कंपनी आहे. मस्क यांना भारतातील कोट्यवधी ग्राहकांच्या बाजारपेठेवर ताबा मिळवायचा आहे. मस्क ( Elon Musk ) यांचे म्हणणे आहे की, रिलायन्स जिओ आणि भारतातील इतर दूरसंचार कंपन्या स्टारलिंकला भारतात येण्यापासून रोखत आहेत. स्थानिक कंपन्यांना भीती आहे की स्टारलिंक आल्यास त्यांची मक्तेदारी संपेल, म्हणून त्या सरकारवर दबाव आणत आहेत. मस्क यांचा युक्तिवाद आहे की, जगातील १६५ हून अधिक देशांनी स्टारलिंकला मंजुरी दिली आहे. मग जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारतच गेल्या ५ वर्षांपासून हा परवाना का अडवून ठेवत आहे? त्यांच्या मते, भारताच्या दुर्गम आणि ग्रामीण भागात जिथे फायबर केबल पोहोचू शकत नाही, तिथे स्टारलिंक थेट अवकाशातून हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकते. मस्क यांचा आरोप आहे की, स्टारलिंकला रोखून भारत सरकार तिथल्या मुलांच्या शिक्षणावर आणि लहान व्यवसायांवर अन्याय करत आहे. वरवर पाहता मस्क यांचा हा युक्तिवाद भारतीय ग्राहकांच्या फायद्याचा वाटू शकतो. पण, या कॉर्पोरेट दाव्याच्या मागे एक अजेंडा लपलेला आहे.
हेही वाचा : Tesla Roadster Car : एलॉन मस्क यांची उडणारी कार? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
१. डिजिटल वसाहतवादाला भारताचा नकार ( Starlink India )
भारताचा इतिहास संवेदनशील आहे. १६०० च्या दशकात ‘ईस्ट इंडिया कंपनी’ व्यापाराचा परवाना मागण्यासाठी भारतात आली होती. हळूहळू त्यांनी येथील अंतर्गत वाद आणि धोरणांमध्ये हस्तक्षेप करून संपूर्ण देशाला गुलाम बनवले. आजचा भारत हा १६व्या शतकातील भारत नाही. भारत ही जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि एक अण्वस्त्रधारी महासत्ता आहे. एलोन मस्क हे सोशल मीडियावरून भारत सरकारला किंवा येथील लोकशाही यंत्रणेला हुकूम देऊ शकत नाहीत. भारताचे कायदे आणि धोरणे दिल्लीतील संसद ठरवणार, अमेरिकेतील एखाद्या अब्जाधीशाच्या’X हँडलवरून ती ठरवली जाऊ शकत नाहीत.
२. राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता ( Starlink India )
सॅटेलाइट इंटरनेट हे सामान्य केबल इंटरनेटसारखे नसते. याचा डेटा परदेशी उपग्रहांमधून येतो आणि जातो. जर मस्क यांच्या स्टारलिंकला संपूर्ण सूट दिली, तर भारतातील कोट्यवधी जनतेचा, लष्कराचा आणि संवेदनशील संस्थांचा डेटा थेट अमेरिकेतील सर्व्हर्सवर जाईल. भारत सरकारने स्टारलिंकसमोर फक्त दोनच प्रमुख अटी ठेवल्या आहेत, पहिली म्हणजे भारताचा डेटा भारतातच सुरक्षित राहिला पाहिजे आणि दुसरी म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व सिक्युरिटी क्लिअरन्स कंपनीने पूर्ण केली पाहिजे. मस्क यांना या नियमांमध्ये स्वतःसाठी विशेष सवलत हवी आहे, जी भारत सरकार आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करून कधीही देऊ शकत नाही.
३. मस्क यांचा दुटप्पीपणा: चीनसमोर मवाळ, भारतासमोर आक्रमक
एलोन मस्क यांच्या भूमिकेतील सर्वात मोठा ढोंगीपणा हा त्यांच्या चीनमधील वर्तनातून दिसून येतो. मस्क यांच्या टेस्ला गाड्यांची एक मोठी फॅक्टरी चीनमध्ये आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची राजवट आहे आणि तिथले नियम अत्यंत कडक आहेत. चीनने स्टारलिंकवर पूर्णपणे बंदी घातली आहे. पण मस्क यांनी कधीही चीनच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा तिथल्या कम्युनिस्ट सरकारला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे धाडस दाखवले नाही. तिथे ते चीनच्या सर्व अटी मुकाट्याने मान्य करतात. मग भारतात, जिथे लोकशाही आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तिथे मस्क Pressure Tactics का वापरत आहेत? कारण त्यांना माहित आहे की भारतातील लोकशाही व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन सरकारवर जाहीर दबाव आणता येतो. भारताने मस्क यांचा हाच दुटप्पीपणा ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
४. कायदे सर्वांसाठी समान आहेत
भारताच्या दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, रिलायन्स जिओ सॅटकम किंवा एअरटेलची वनवेब या भारतीय कंपन्यांनाही अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. सुरक्षा तपासणीच्या प्रक्रियेतून सर्वांनाच जावे लागत आहे. मस्क यांना वाटते की ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, म्हणून भारताने नियमांची बाजू सारून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले पाहिजे. पण भारताच्या लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे, पैशाचे किंवा भांडवलदारांचे नाही. एलोन मस्क यांनी भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगातील विविध देशांच्या सार्वभौमत्वाला आणि तिथल्या लोकशाही यंत्रणांना आव्हान देण्याचा मस्क यांचा जुना इतिहास आहे. जेव्हा एखादा देश मस्क यांच्या व्यावसायिक हितसंबंधांच्या आड येतो, तेव्हा ते आपल्या ट्विटर या व्यासपीठाचा वापर करून तिथल्या सरकारविरुद्ध मोहीम उघडतात. नुकतेच ब्राझीलमध्ये मस्क यांनी तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना मानण्यास नकार दिला होता. तिथल्या न्यायमूर्तींनी जेव्हा द्वेष पसरवणारी खाती बंद करण्याचे आदेश दिले, तेव्हा मस्क यांनी न्यायाधीशांना ‘हुकूमशहा’ म्हटले. परिणामी, ब्राझील सरकारने मस्क यांच्या X वर पूर्ण बंदी घातली आणि स्टारलिंकची बँक खाती गोठवली. अखेर मस्क यांना नमते घ्यावे लागले आणि ब्राझीलचे कायदे मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने जेव्हा सोशल मीडियावरील हिंसक मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला, तेव्हा मस्क यांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारला फॅसिस्ट म्हटले होते.
भारतातही मस्क नेमके हेच करत आहेत. स्टारलिंकला भारतात एंट्री हवी आहे. त्यासाठी भारताचे सुरक्षा नियम शिथिल व्हावेत म्हणून त्यांनी थेट मुकेश अंबानी यांना लक्ष्य करून भारतीय जनतेमध्ये अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, भारत सरकार केवळ काही निवडक अब्जाधीशांच्या फायद्यासाठी काम करत आहे. परंतु, मस्क यांचा हा डाव भारताने ओळखून तो यशस्वी होऊ दिला नाही. मस्क यांचा असा युक्तिवाद आहे की ते भारताला स्पर्धात्मक बनवत आहेत. पण भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, आम्ही स्पर्धेच्या विरोधात नाही, तर आम्ही डिजिटल मक्तेदारी आणि सुरक्षेच्या उल्लंघनाच्या विरोधात आहोत.
हेही वाचा : ‘पंतप्रधान अंबानी!’ मस्कच्या एका पोस्टने खळबळ; भारतात Starlink चा मार्ग का अडला?
राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा संरक्षणाचे प्रश्न ( Elon Musk Starlink India )
भारताने मस्क यांच्यासमोर काही अटी ठेवलेल्या आहेत, भारतीय वापरकर्त्यांचा जो काही डेटा सॅटेलाइटद्वारे गोळा होईल, तो भारताच्या हद्दीतच सुरक्षित राहिला पाहिजे. मस्क याला तयार नाहीत. जर हा डेटा परदेशात गेला, तर त्याचा वापर भारतीय नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी किंवा देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी होऊ शकतो. सॅटेलाइट इंटरनेट हे थेट अंतराळातून चालते. यात लष्करी तळांची, संवेदनशील भागांची माहिती लीक होण्याचा धोका असतो. त्यामुळे भारताच्या गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांची परवानगी बंधनकारक आहे. भारतामध्ये एअरटेल आणि रिलायन्स या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून भारतीय नियमांनुसार सॅटेलाइट परवान्यासाठी अर्ज केले आहेत. मस्क यांना जर विशेष सवलत दिली, तर तो भारतीय कंपन्यांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर अन्याय ठरेल.
आजचा भारत हा १९४७ पूर्वीचा परस्वाधीन भारत नाही, किंवा तो आफ्रिकेतील एखादा लहान देश नाही ज्याला तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून एखादा परदेशी अब्जाधीश ब्लॅकमेल करू शकेल. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि दुसरी सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ आहे. मस्क यांना भारतात व्यापार करायचा असेल, तर त्यांचे स्वागतच आहे, पण ते भारताच्या अटींवर आणि भारतीय संविधानाचा व कायद्यांचा आदर करूनच करावे लागेल. कोणत्याही परदेशी अब्जाधीशाला भारताची धोरणे हायजॅक करण्याची परवानगी ही लोकशाही कधीच देणार नाही. हाच या संपूर्ण वादाचा मुख्य चेहरा आहे, बाकी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा….









