• Home
  • देश
  • कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Top News

कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Police and emergency vehicles at the scene after a shooting at a children's birthday party in California

California birthday party shooting : शनिवारी रात्री अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन इथं एक भयानक गोळीबार झाला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात आतापर्यंत सुमारे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ही घटना मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान घडली, त्यामुळं परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे आणि तपास सुरु केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

गोळीबारामुळं परिसरात खळबळ :

शनिवारी रात्री कॅलिफोर्नियातील स्टॉकटनमध्ये झालेल्या गोळीबारामुळं संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. सॅन जोक्विन काउंटी शेरीफ कार्यालयानं या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. सर्व जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, जखमींच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

 

घटनास्थळ पूर्णपणे सील :

गोळीबाराचं वृत्त मिळताच, पथकं घटनास्थळी पोहोचली आणि परिसराला घेराव घातला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपास यंत्रणा आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा करत आहेत आणि घटनेच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. गोळीबाराचं कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप कळलेली नाही.

हे ही वाचा : श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर चक्रीवादळ दित्वा भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर; विमानासह रेल्वेसेवा विस्कळीत

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :

कॅलिफोर्नियातील स्टॉकटन इथं झालेल्या गोळीबारात किमान 19 जण जखमी झाले आहेत, ज्यात 9 ते 12 वयोगटातील मुलं आणि 23 वर्षीय एका पुरुषासह अनेक प्रौढांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, परंतु परिस्थिती गंभीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि अधिक माहिती येताच मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे आणि त्यांना सीपीआर देण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले :

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये पोलिसांची मोठी उपस्थिती आणि रुग्णवाहिका दिसून येतात. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि रहिवासी घाबरलेल्या स्थितीत आहेत. एका व्यक्तीनं सोशल मीडियावर लिहिलं की त्यांनी गोळीबार ऐकला आणि विचारलं की कोणी पांढऱ्या रंगाची एसयूव्ही पाहिली आहे का. दुसऱ्या एका साक्षीदाराने सांगितले की त्यांना सुरुवातीला फटाके वाटले होते, परंतु नंतर लक्षात आलं की गोळीबार आहे. दरम्यान पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी जनतेला कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांशी शेअर करण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts