Harassment of married woman : तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेचा “मुलगा होत नाही” तसेच “माहेरहून सोने आणले नाही” या कारणांवरून अनेक वर्षे मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पलूस येते रहिवासी असलेले वडील फिर्यादी सुभाष बळवंत कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव (वय ३७ वर्षे) हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर आरती ही पतीसह तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे वास्तव्यास होती. आरोपींकडून आरती हिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता.
“तुला मुलगा होत नाही” तसेच “माहेरहून सोने आण” या कारणांवरून तिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते.. तर पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचे विवाहितेच्या आईने आरोप केला आहे.
आरोपी सध्या नागपट्टीनम येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्हा २६ मे २०२६ रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. मात्र घटना तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण नागपट्टीनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विवाहितेच्या भावाने केली आहे.












