NESCO Concert Drug Case: नेस्को कॉन्सर्ट ड्रग प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिया जेकबला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग ओव्हरडोस प्रकरणात एका मृत्यूची नोंद झाल्यानंतर तपासाला मोठी दिशा मिळाली आहे. या प्रकरणात वनराई पोलिसांनी अभिनेत्री जिया जेकब हिला अटक केली असून तिच्यावर ड्रग नेटवर्कशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
हेही वाचा: सह्याद्रीच्या जंगलात दिसला दुर्मीळ ‘ब्लॅक पॅंथर’; कॅमेऱ्यात कैद छायाचित्र
३३ वर्षी जिया जेकबला मीरा रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्या बँक खात्यांचा वापर ड्रग व्यवहारांशी जोडलेल्या पेमेंट्ससाठी झाल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
आर्थिक व्यवहारांमधून ‘मनी ट्रेल’ चा उलगडा
तपासात आरोपी आणि जिया जेकब यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुष साहित्यासोबतच्या डिजिटल चॅट्सचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
खात्यात रक्कम
पोलिसांच्या माहितीनुसार विविध आरोपींनी जियाच्या खात्यात रक्कम पाठवली आहे. आनंद पटेलने 64,000, विनीत गीरलानीने 22,500, शुभ अग्रवालने 1,66,400 आणि आयुष साहित्यने 1,84,600 इतकी रक्कम ट्रान्सफर केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे व्यवहार कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज व्यवहाराशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कॉन्सर्ट उपस्थिती आणि फरार आरोपीशी संबंधाचा संशय
तपासात असेही समोर आले आहे की जिया जेकब संबंधित कॉन्सर्टमध्ये उपस्थित होती, जिथे ड्रग ओव्हरडोसची घटना घडली. पोलिसांचा दावा आहे की ती मागील काही वर्षांपासून एका फरार ड्रग सप्लायरच्या संपर्कात होती, जो सध्या परदेशात असल्याचे सांगितले जाते.
तिच्या खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. तिचे वैयक्तिक खर्च कथितपणे या फरार आरोपीकडून भागवले जात होते, अशीही माहिती तपासातून मिळाली आहे. मात्र तिला संपूर्ण ड्रग रॅकेटची पूर्ण माहिती नसावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ड्रग्ज जप्ती आणि तपासातील महत्त्वाचा खुलासा
आरोपी आयुष साहित्यच्या जबाबानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत 933 गोळ्या (सुमारे 435 ग्रॅम) जप्त केल्या आहेत, ज्यांची किंमत सुमारे 15.49 लाख असल्याचे सांगण्यात येते.
हे ड्रग्ज पोलादपूर परिसरात फेकण्यात आले होते. आरोपी मुंबईहून गोव्याकडे पळण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली. सुरुवातीला काहीच सापडले नव्हते, मात्र नंतर त्यानेच ड्रग्ज फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
न्यायालयीन कारवाई
सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून जिया जेकबला 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात अजूनही तपास सुरू असून ड्रग नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.











