IIM Bangalore UG School: IIM बंगळुरूने नव्या UG स्कूलची सुरुवात केली आहे. AI, Data Science आणि Economics यांचा संगम असलेल्या या चार वर्षांच्या निवासी अभ्यासक्रमाचा पहिला वर्ग 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे.
भारतातील नामांकित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या IIM बंगळुरूने पदवी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. संस्थेने Tata Trust सोबत नवीन अंडरग्रॅज्युएट स्कूल सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. विशेष म्हणजे, या नव्या उपक्रमाच्या पहिल्याच बॅचसाठी तब्बल १२ हजार अर्ज आले होते; त्यापैकी केवळ ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या नव्या संस्थेचे नाव IIMB-Dorabji Tata School of Undergraduate Studies असे आहे. तंत्रज्ञान, डेटा आणि अर्थशास्त्र यांचा संगम असलेले शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असणार आहे.
३१ ऑगस्टपासून पहिल्या बॅचला सुरुवात
नव्या UG स्कूलमधील पहिल्या बॅचचे शैक्षणिक सत्र 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. एकूण ८० विद्यार्थ्यांमध्ये दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ४० विद्यार्थ्यंची निवड करण्यात आली आहे. यातील ४० विद्यार्थी BSc (Hons) in Data Sciences, तर 40 विद्यार्थी BSc (Hons) in Economics या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतील.
दोन्ही अभ्यासक्रम चार वर्षाचे पूर्णवेळ आणि निवासी स्वरूपाचे असतील. मात्र या अभ्यासक्रमाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या मुख्य विषयापुरतं शिक्षण मर्यादित राहणार नाही.
Data Sciences शिकणाऱ्यांना Economics, तर Economicsच्या विद्यार्थ्यांना Data Sciences
डेटा सायन्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना शिकवल्या जातील. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्सची प्राथमिक माहिती दिली जाईल.
यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र या दोन्ही क्षेत्रांकडे एकत्रितपणे पाहण्याची संधी मिळणार आहे. भविष्यातील उद्योग आणि रोजगाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे दिसून येते. ( LS Marathi News Channel )
Tata Trusts ची महत्त्वाची भूमिका
या नव्या UG स्कूलच्या उभारणी आणि सुरुवातीच्या विकासासाठी Tata Trusts कडून सहकार्य केले जाणार आहे. आधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्यापासून ते संशोधन क्षमता वाढवण्यापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये Tata Trusts मदत करणार आहे.
यासोबतच स्कूलची भविष्यातील दिशा, प्रशासन, धोरणात्मक नियोजन, नवीन फॅकल्टीची निर्मिती आणि संशोधनाचा विस्तार यासाठीही सहकार्य केले जाणार आहे.
या करारावर Tata Trusts चे चेअरमन नोएल टाटा आणि IIM बंगळुरूच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या चेअरपर्सन डॉ. देवी शेट्टी यांनी स्वाक्षरी केली आहे.
AI आणि टेक्नॉलॉजीला केंद्रस्थानी ठेवणार
नव्या UG स्कूलची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे Artificial Intelligence आणि Data Sciences वर असलेला विशेष भर.
AI मुळे उद्योग, प्रशासन आणि समाजाच्या कामकाजात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता तंत्रज्ञानाचा व्यवसाय आणि समाजाशी असलेला संबंध समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
AI, डेटा सायन्स, अल्गोरिदम डिझाइन, भारतीय ज्ञान प्रणाली आणि व्यवसाय यांचा परस्पर संबंध तपासणाऱ्या संशोधनालाही येथे प्रोत्साहन दिले जाणार आहे.
IIMच्या मुख्य कॅम्पसपासून 23 किमीवर नवा कॅम्पस
या नव्या UG स्कूलसाठी स्वतंत्र कॅम्पस विकसित केला जात आहे. हा कॅम्पस IIM बंगळुरूच्या बन्नेरघट्टा रोडवरील सध्याच्या कॅम्पसपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर जिगणी-अनेकल परिसरात उभारला जात आहे.
UG विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन हा कॅम्पस निवासी आणि शैक्षणिक स्वरूपाचा असेल. आधुनिक क्लासरूम, संशोधन सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या निवासासाठी आवश्यक सोयी येथे विकसित केल्या जात आहेत.
हेही वाचा: मुलाला वाचवण्यासाठी वडिलांची धाव; डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेत आई-वडील अन् मुलाचा मृत्यू
12 हजार विद्यार्थ्यांची उत्सुकता, 80 जणांना संधी
पहिल्याच प्रवेश प्रक्रियेत सुमारे 12 हजार अर्ज येणे ही या नव्या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता दाखवते. त्यापैकी निवडक 80 विद्यार्थ्यांपासून या नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात होणार आहे.
IIM बंगळुरूचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भारतातील पदवी शिक्षणामध्ये मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, AI आणि डेटा सायन्स यांना एकत्र आणणाऱ्या शिक्षणपद्धतीला नवी दिशा मिळू शकते.


