Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • NEET निकालानंतर नवा वाद; उत्तरतालिका एक, स्कोअरकार्ड दुसरे? बीडसह अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी
शैक्षणिक बातम्या

NEET निकालानंतर नवा वाद; उत्तरतालिका एक, स्कोअरकार्ड दुसरे? बीडसह अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी

NEET UG

NEET UG पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चर्चेत आली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी निकाल प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले असून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यासह विविध भागांतील विद्यार्थ्यांनी अधिकृत उत्तरतालिका आणि अंतिम स्कोअरकार्डमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला आहे.

NEET UG पेपरफुटीच्या प्रकरणानंतर घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, निकाल प्रसिद्ध होताच काही विद्यार्थी आणि पालकांनी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची तक्रार केली. तसेच, OMR शीट आणि अधिकृत उत्तरतालिकेतील गुणांचा अंतिम निकालाशी मेळ लागत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकृत उत्तरतालिकेच्या आधारे त्यांनी मोजलेले संभाव्य गुण आणि अंतिम स्कोअरकार्डमधील गुण यामध्ये मोठी तफावत आहे. काही विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या लॉगिनवर अपलोड करण्यात आलेली OMR शीट ही त्यांनी परीक्षेत भरलेल्या उत्तरपत्रिकेशी जुळत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निकाल प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

हेही वाचा: ‘सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाला’; सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

बीडमधील विद्यार्थिनीचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वडवणी येथील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिनेही निकालाबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अधिकृत उत्तरतालिकेनुसार तिला ७२० पैकी सुमारे ७०२ गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतिम स्कोअरकार्डमध्ये केवळ ८७ गुण दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ज्ञानेश्वरीचे वडील अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडे राहणारी मूळ प्रश्नपत्रिका त्यांच्या ताब्यात असून, तिच्या आधारे गुणांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, NTAच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली OMR शीट त्यांच्या मुलीने भरलेल्या उत्तरपत्रिकेशी जुळत नसल्याचा आरोपही केला आहे.

अपेक्षित ५२२ गुण, निकालात ९५?

सोहम गवते या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनीही अशाच प्रकारची तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकृत उत्तरतालिकेनुसार सुमारे ५२२ गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतिम निकालात केवळ ९५ गुण नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कानपूरमधील विद्यार्थिनीचाही दावा

दरम्यान, कानपूर येथील एका विद्यार्थिनीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आणखी गंभीर आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, १६ जुलैच्या रात्री तिच्या स्कोअरकार्डमध्ये ५४० गुण दिसत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तेच स्कोअरकार्ड पुन्हा तपासले असता गुण १६७ इतके दाखवले जात होते. एका रात्रीत ३७३ गुण कसे कमी झाले, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

या विद्यार्थिनीने तिची उत्तरपत्रिका, वेगवेगळ्या वेळेचे स्कोअरकार्डचे स्क्रीनशॉट आणि NTA तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे.

NTAकडे चौकशीची मागणी

या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी NTAकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्याचे सांगितले आहे. तसेच, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या आरोपांची दखल घेऊन निकाल प्रक्रियेची सखोल चौकशी करावी आणि आवश्यक असल्यास संपूर्ण प्रक्रियेची फेरतपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणांबाबत NTAकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांची सत्यता अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत निश्चित झालेली नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts