Abhijeet Dipke: सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जंतरमंतरवरून हलवल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनातून पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी स्वतः आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्यामुळे शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. प्रशासनाने ही कारवाई वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली पाहायला मिळत आहे.
आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दिपके भावूक झाले. त्यांनी सांगितले की, ” आजपासून मी स्वतः आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे म्हंटले आहे. सोनम सरांना आंदोलनस्थळावरून हटवले म्हणून हा लढा थांबेल, असा सरकारचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. आमचं आंदोलन पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने सुरू राहील.”
20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा
दिपके यांनी 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणारा मोर्चाही नियोजनाप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले. “सोनम सर रुग्णालयात असले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही. संसद मार्च ठरल्याप्रमाणेच निघेल,” असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारवर निशाणा
यावेळी त्यांनी आंदोलनाच्या मागण्यांमध्ये आणखी वाढ करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “याआधी आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो. आता या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोपही केले
दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोपही केले. आंदोलनादरम्यान आपल्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आणि काही कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
वांगचुक यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाच्या मते, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवणे आवश्यक होते.
विविध मागण्यांसाठी उपोषण
सोनम वांगचुक यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यांसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.









