Ashok Kharat Heath News: नाशिकचा भोंदू अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. अशातच आता अशोक खरातची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या प्रकरणात अशोक खरात याची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असताना अचानक त्याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने अधिकाऱ्यांमध्ये काही काळ गडबड उडाली आणि तातडीने वैद्यकीय मदत बोलावण्यात आली.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी चालू असतानाच खरातला चक्कर येणे, मळमळ आणि छातीत दुखण्यासारखी लक्षणे जाणवली. परिस्थिती लक्षात घेऊन त्याची त्वरित तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या टीमने प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय निरीक्षण ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, तपास यंत्रणांनी या प्रकरणाशी संबंधित इतर आर्थिक दुव्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील काही व्यावसायिकांशी संबंधित व्यवहारांची छाननी सुरू असून, संशयित आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत सखोल माहिती गोळा केली जात आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी न्यायालयात खरातच्या वकिलांनी त्याला न्यूरोलॉजिकल समस्या असून न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी केली होती. अशातच आता अचानक खरातची प्रकृती बिघडली आहे. तर आता डॉक्टरांनी खरातची प्राथमिक तपासणी केली असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे.
पुढील टप्प्यात
दरम्यान, अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या (23 एप्रिल) संपत आहे. त्यामुळे आता एसआयटीच्या पथकाने या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सुरूवात केली आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात अधिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात असून, लवकरच संबंधितांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत.











