Top News

बुरख्याचा वाद पेटला! “उपोषण करू पण, कॉलेजच्या आदेशाचं पालन नाही…” विद्यार्थ्यांचा संताप

burkha

Burkha Controversy : गोरेगाव येथील विवेक ज्युनियर कॉलेजमध्ये एक नवीन ड्रेस कोडवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे कॉलेजमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्रेस कोडवरून गेल्या दोन दिवसांपासून काॅलेज कॅम्पसबाहेर वादविवाद, संताप आणि प्रश्नांची धूळ उडत आहे. कॉलेजने त्यांच्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, मुली बुरखा आणि निकाब घालून वर्गात येऊ शकत नाहीत. त्याशिवाय, कुर्ता-पायजामा आणि टोप्या हे पोशाख पेहराव करून येण्यास मुलांना प्रतिबंधित करण्यात आलं आहे. कॉलेजचा असा दावा आहे की, हा नियम शिस्त राखण्यासाठी आणि ओळख लपवून फसवणूक रोखण्यासाठी बनवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ते गरज पडली तर उपोषण करतील पण, कॉलेजच्या आदेशाचे पालन करणार नाहीत.

विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. अनेक मुस्लिम महिला विद्यार्थ्यांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही वर्षानुवर्षे बुरखा घालून वर्गात येत आहोत. आम्ही कसे चुकीचे असू शकतो?” एआयएमआयएमच्या महिला शाखेच्या नेत्या जहांआरा शेख देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांचा आरोप आहे की, हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने आणणारा आहे.

हेही वाचा –  5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद; या मागण्यांसाठी उद्या होणार शाळा बंद आंदोलन

कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये जावे लागत..

महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या वादाचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा वाद आता मोठा झाला आहे. बुरखा घातलेल्या मुलींना कॉलेजच्या गेटवर थांबवण्यात आलं. आता त्यांना कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये जावे लागत असल्याचं विद्यार्थिनीचं म्हणणं आहे. वर्गात जाण्यापूर्वी त्या प्रथम त्यांचे बुरखे काढतात आणि नंतर निघण्यापूर्वी ते परत घालतात. कॉलेजचे म्हणणे आहे की, चेहरा झाकणाऱ्या कपड्यांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात ओळखणे कठीण जाते. त्यामुळे फसवणूक किंवा अनुचित वर्तनाचा धोका वाढतो. व्यवस्थापनाला धर्मनिरपेक्ष वातावरण देखील राखायचे आहे.

प्राचार्य यांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं..

एआयएमआयएमच्या महिला शाखेच्या नेत्या जहांआरा शेख या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, “हे आमच्या धर्मावर बंदी घालण्यासारखे आहे. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. जर कॉलेजने माघार घेतली नाही तर आम्ही उपोषण करू.” शेख आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ १ डिसेंबर रोजी गोरोगाव पश्चिम येथील तीन डोंगरी पोलिस ठाण्यात पोहोचले, जिथे प्राचार्य यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. व्यवस्थापनाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts