DRDO Paid Internship: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता DRDO मध्ये पेड इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होत आहे. चला तर जाणून घेऊयात यासाठी कोण अर्ज करू शकतात आणि स्टायपेंड किती मिळणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था रक्षा संशोधन आणि विकास संस्था ( DRDO)मध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. DRDO ने BE/B.Tech तसेच ME/M.Tech च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून पेड इंटर्नशिपसाठी अर्ज मागवले आहेत. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.
DRDO ही संस्था देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये अग्नी, आकाश यांसारख्या क्षेपणास्त्र प्रणाली, विमान तंत्रज्ञान आणि रडार प्रणालींचा समावेश आहे. ही संस्था आपल्या मुख्यालयासह देशभरातील ५० हून अधिक प्रयोगशाळांच्या नेटवर्कद्वारे कार्य करते.
हेही वाचा: ४० दिवसांची कोठडी, सातवा गुन्हा दाखल; खरात अधिक अडचणीत, आज पुन्हा करणार न्यायालयात हजेरी
ही इंटर्नशिप सहा महिन्यांची असेल आणि निवड झालेल्या उमेदवारांना १५,००० रुपयांचे स्टायपेंड दिले जाणार आहे. हे स्टायपेंड दोन हप्त्यांमध्ये मिळेल. पहिला तीन महिन्यांनंतर आणि दुसरा सहा महिने पूर्ण झाल्यावर. स्टायपेंड मिळवण्यासाठी दरमहा किमान १५ दिवस उपस्थिती अनिवार्य असेल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२६ आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर आणि आवश्यकतेनुसार केली जाईल. यासोबतच ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मुलाखतही घेतली जाऊ शकते. समान गुण असल्यास जन्मतारखेच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळवले जाईल.
कोण अर्ज करू शकतो
ज्या विद्यार्थ्यांचे २०२६-२७ शैक्षणिक वर्षात BE/B.Tech किंवा ME/M.Tech अंतिम वर्ष सुरू असेल, ते या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा
उमेदवारांनी अर्जासोबत आपल्या महाविद्यालयाकडून मिळालेलं शिफारस/स्पॉन्सरशिप पत्र जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा लागेल आणि लिफाफ्यावर “पेड इंटर्नशिपसाठी अर्ज” असे स्पष्ट लिहिणे गरजेचे आहे.
पत्ता
निदेशक
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी अँड अॅलाइड सायन्सेस
रक्षा संशोधन आणि विकास संस्था (DRDO), संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली – ११००५४






