• Home
  • महाराष्ट्र
  • राज्यभर बेमुदत संप! ८५ हजार कृषी केंद्र बंद; शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता, नेमका काय प्रकार जाणून घ्या
महाराष्ट्र

राज्यभर बेमुदत संप! ८५ हजार कृषी केंद्र बंद; शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता, नेमका काय प्रकार जाणून घ्या

Maharashtra agriculture strike

Maharashtra agriculture strike: राज्यभरातील सुमारे ८५ हजार कृषी सेवा केंद्रांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या निर्णयाचा शेती क्षेत्रातील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या संपामागील नेमकी कारणे काय आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी मोठा निर्णय घेत आजपासून अनिश्चितकालीन बंद पुकारला आहे. खत आणि बियाणे विक्रेत्यांच्या या आंदोलनात राज्यातील सुमारे ८५ हजार केंद्राचा सहभाग असून, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात हा निषेध नोंदवला जात आहे. माफदा संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप आयोजित करण्यात आला असून, देशातील इतर काही राज्यांतील केंद्र चालकांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. मागण्या मान्य न झाल्यास पॉश पॉस मशीन शासनाकडे परत करण्याचा इशाराही देण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी दिली.

हेही वाचा: ४० दिवसांची कोठडी, सातवा गुन्हा दाखल; खरात अधिक अडचणीत, आज पुन्हा करणार न्यायालयात हजेरी

संघटनेनुसार, शासनाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे कृषी सेवा केंद्र चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या निर्णयांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या बंदमध्ये राज्यभरातील सर्व केंद्रांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

या आंदोलनामागे अनेक मुद्दे मांडले गेले आहेत. अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रोत्साहन देणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धतीला विरोध, तसेच अवैध कीटकनाशके व खते एजंटमार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर बंदी घालण्याची मागणी यामध्ये आहे. याशिवाय ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्यास विरोध असून, किरकोळ विक्रेत्यांवर लादलेले नियम व्यवसायासाठी अडथळा ठरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एक्सपायरी झालेल्या उत्पादनांची परतफेड कंपन्यांकडून न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नवीन कायद्यांमुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात

हिंगोली जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे ७०० कृषी सेवा केंद्र चालकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या बंदचा परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरिप हंगाम जवळ आला असून, शेतकरी सध्या बियाणे आणि खतांची खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत सेवा केंद्रे बंद राहिल्यास शेतीच्या कामांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts