• Home
  • राजकारण
  • अर्धवट सिमेंट रस्त्यांनी नागरिकांचे जगणे मुश्कील; जामनेर नगर परिषदेचा भोंगळ कारभार
ताज्या बातम्या

अर्धवट सिमेंट रस्त्यांनी नागरिकांचे जगणे मुश्कील; जामनेर नगर परिषदेचा भोंगळ कारभार

Damaged and incomplete cement road causing inconvenience to citizens in Jamner

Jamner incomplete cement roads : जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध प्रभागांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले. मात्र या कामांचा दर्जा आणि नियोजनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पाटीलवाडी ते अशोक सम्राट नगर जोडणारा रस्ता तब्बल वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्ता खोदून सिमेंटचा पहिला थर टाकल्यानंतर नगरपालिकेने हे काम जणू कायमचे थांबवून ठेवल्याचे चित्र आहे.

हा उपाय की तात्पुरता ढिसाळपणा

या अर्धवट कामांमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच समस्यांमध्ये भर घालत काल नगरपालिकेच्या वतीने सिमेंट रस्त्यांवर पडलेले खड्डे मुरूम व मोठमोठे दगड टाकून बुजवण्यात आले. हा उपाय ठरवलेला की तात्पुरता ढिसाळपणा, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हे ही वाचा :  सोलापूर महानगरपालिका निवडणूक: एबी फॉर्मवरून वाद पेटला

प्रशासन नेमके काय करत आहे

मुरूम आणि मोठ्या दगडांमुळे रस्ते अधिकच धोकादायक बनले असून दोन ते तीन दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या अपघातांत केवळ किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेशी असा बेफिकीर खेळ सुरू असताना नगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासनाकडून जाणून-बुजून काना-डोळा

अर्धवट कामे, निकृष्ट दुरुस्ती आणि अपघातांची मालिका याकडे प्रशासन जाणून-बुजून काना-डोळा करत आहे का, की कुणाच्या दबावाखाली दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध तुटण्याआधी नगरपालिकेने जबाबदारीने या कामांकडे लक्ष देऊन तातडीने रस्ते पूर्ण करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts