HSRP Number Plate: २०२५ मध्ये HSRP लावण्यासाठी तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा २०२६ मध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांना HSRP बसवण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP)बसवण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून आता वाहनधारकांना सुमारे दीड महिन्यांचा अतिरिक्त अवधी मिळणार आहे.
याआधी HSRP बसवण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर अशा पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर आता जुन्या वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य करण्याचा निर्णय पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे.
१ जुलैपासून नियम कडक
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
नवीन वाहनांमध्ये HSRP आधीच बसवले जात असल्याने हा नियम प्रामुख्याने जुन्या वाहनांना लागू होतो. मात्र तपासणीची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने अनेक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेट बसवलेली नाही.
ऑनलाइन नोंदणीची सुविधा
वाहनधारकांना HSRP ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करून बसवता येते. त्यामुळे तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी वाहनधारकांनी मुदतवाढीचा गैरफायदा न घेता लवकरात लवकर HSRP बसवावी असे सांगितले आहे.







