Maulana Jarjees Ansari: श्रीकृष्ण हे मुस्लीम धर्माचे होते, ते दिवसातून पाच वेळा नमाज पठाण करायचे, हे वादग्रस्त वक्तव्य सोशल मिडीयावर व्हायरल झालं आणि देशात वातावरण तापलं, कोणी केलं हे वक्तव्य आणि काय आहे. हा प्रकार जाणून घेऊयात
उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असलेल्या मौलाना जरजिस अन्सारी या विवादित इस्लामिक वक्त्याने भगवान श्रीकृष्णांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे संपूर्ण देशात धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हिंदू संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत मौलाना अन्सारीच्या अटकेची मागणी केली आहे. झारखंडमध्ये २३ जून रोजी आयोजित एका धार्मिक सभेला संबोधित करताना मौलाना जरजिस अन्सारी याने हे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
मौलाना स्पष्टपणे म्हणतात
या व्हिडिओमध्ये मौलाना (Maulana Jarjees Ansari) स्पष्टपणे म्हणताना दिसत आहे की, जर हिंदू बांधवांना वाईट वाटणार नसेल तर मी सांगू इच्छितो की भगवान श्रीकृष्ण (Loard Shree Krushna) हे धर्माने मुस्लिम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे.आपला हा दावा खरा सिद्ध करण्यासाठी मौलाना जरजिसने हिंदूंचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
त्याने भगवद्गीतेच्या ६ व्या अध्यायातील १० व्या श्लोकाचा संदर्भ दिला
या श्लोकाचा पूर्णपणे चुकीचा आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावत त्याने असा युक्तिवाद केला की, भगवान श्रीकृष्ण यामध्ये अर्जुनाला ईश्वरभक्ती करताना संपूर्ण शरीराचा योग करण्यास सांगत आहेत, ज्याचा अर्थ नमाज पठण असा होतो. याशिवाय, प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांनी देखील जगात इस्लाम आणि दीनचाच प्रचार केला होता, असा अत्यंत हास्यास्पद आणि जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा दावाही त्याने आपल्या भाषणात केला. (Bhagavad Gita Controversy)
कोट्यवधी हिंदूंच्या आराधनेचा आणि श्रद्धेचा घोर अपमान
मौलाना अन्सारीचे हे विधान समोर आल्यानंतर मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण कमालीचे तापले आहे. हिंदू संघटना, संत आणि धार्मिक नेत्यांनी या वक्तव्याला कोट्यवधी हिंदूंच्या आराधनेचा आणि श्रद्धेचा घोर अपमान म्हटले आहे. अयोध्या येथील प्रसिद्ध संत विष्णू दास यांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत मौलाना जरजिस अन्सारी याची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
संस्कृत भाषेचे किंवा हिंदू शास्त्रांचे कोणतेही ज्ञान नाही
अन्सारीला संस्कृत भाषेचे किंवा हिंदू शास्त्रांचे कोणतेही ज्ञान नसून तो केवळ धार्मिक तेढ आणि द्वेष निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे पवित्र श्लोकांचा विपर्यास करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायदेशीर पावलेही उचलण्यात आली आहेत. अखिल भारतीय हिंदू महासभेने या प्रकरणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली असून, लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात मौलाना जरजिस अन्सारीविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कार्यकर्ते रस्त्यावर
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मौलानाच्या छायाचित्रांची विटंबना करत तीव्र निदर्शने केली आणि त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात केवळ हिंदू संघटनाच नव्हे, तर मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांनी आणि विद्वानांनीही मौलाना जरजिसच्या वक्तव्याला अवाजवी आणि पूर्णपणे चुकीचे ठरवले आहे.
मोहम्मद तौसीफ आलम यांची प्रतिक्रिया
बिहारमधील किशनगंज येथील एआयएमआईएम पक्षाचे आमदार मोहम्मद तौसीफ आलम यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मौलाना जरजिस काहीही बोलला म्हणून ते वैध ठरत नाही. मुस्लिम समाज केवळ कुराण आणि हादीस यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवतो, कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक वक्तव्यावर नाही. त्यांनी स्पष्ट केले की इस्लाम धर्मानुसार नमाज पठणाचा नियम पैगंबर मोहम्मद यांच्या आगमनानंतर ७ व्या शतकात सुरू झाला, त्यामुळे त्याच्या हजारो वर्षे आधी अस्तित्वात असलेल्या श्रीकृष्णांच्या काळात नमाज असण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही.
हेही वाचा: स्वस्तात मस्त! RailOne ॲपवर जनरल तिकीट बुक करा आणि मिळवा ३% सूट; पण फक्त ‘या’ एका अटीवर
भगवान श्रीकृष्णांचा काळ
ऐतिहासिक आणि पौराणिक कालगणनेनुसार, द्वापार युगातील भगवान श्रीकृष्णांचा काळ आजपासून सुमारे ५००० वर्षांपेक्षा जुना मानला जातो, तर इस्लाम धर्माची स्थापना ७ व्या शतकात म्हणजे केवळ १४०० वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या कालखंडांची आणि संस्कृतींची अशी गल्लत करणे निव्वळ अज्ञान किंवा पूर्वग्रहदूषित राजकीय खेळी असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
मौलाना जरजिस अन्सारी याच्याबद्दल सांगायचे तर, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे. २०२२ मध्ये वाराणसीच्या एका विशेष न्यायालयाने त्याला एका महिलेवर बलात्कार करणे, धमकावणे आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली दोषी ठरवून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली होती.
सोशल मीडियावर या वक्तव्यावरून मोठा वाद
सध्या सोशल मीडियावर या वक्तव्यावरून मोठा वैचारिक संघर्ष सुरू असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत असून चिथावणीखोर भाषण करणाऱ्या मौलानावर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






