Breaking News :
  • Home
  • देश
  • दुबई ड्रग्ज साम्राज्य! दाऊदचा साथीदार सलीम डोलाला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक
Top News

दुबई ड्रग्ज साम्राज्य! दाऊदचा साथीदार सलीम डोलाला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

Salim Dolala arrested

Salim Dolala arrested : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटविरोधात करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईदरम्यान, भारतीय अमली पदार्थ तस्कर टोळीचा म्होरक्या सलीम डोला याच्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तुर्कीतील इस्तंबूल येथून मुसक्या आवळल्यात. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सलीम डोला हा UAE ची बनावट ओळख वापरून इस्तंबूलमध्ये लपून बसला होता. दाऊद इब्राहिमच्या अमली पदार्थ रॅकेटशी त्याचे लागेबांधे असल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय यंत्रणा विशेषतः मुंबई गुन्हे शाखा अरब अमिरातीसह मध्यपूर्वेतील पाठपुरावा करत होती. त्याला अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.

आज त्याला घेऊन हे पथक दिल्ली विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात आणल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. सलीमची अटक भारतातील मेफेड्रॉन अर्थात एमडी या रासायनिक अमली पदार्थाच्या उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीस जबर धक्का मानला जात आहे. त्याच्या अटकेमुळे मध्य पूर्वेतील देश आणि भारतातील अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांच्या संघटित साखळीची महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती पडू शकते. त्यासाठी गुन्हे शाखेने सलीमचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण व्हावे या उद्देशाने प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.

गुन्ह्यात एकूण २५२ कोटींचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२४ मध्ये सांगलीतील कवठे महांकाळ येथील एमडी उत्पादनाचा अवैध कारखाना उद्ध्वस्त करीत संबंधित आरोपींची धरपकड केली होती. या गुन्ह्यात एकूण २५२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते. या गुन्ह्याच्या तपासात सलीम डोला टोळीचे नाव पुढे आले. या टोळीने मध्यपूर्वेतील देशांत बसून या कारखान्यासाठी अर्थसहाय्य, मनुष्यबळाचा पुवठा केला. तसेच अमली पदार्थांच्या विक्रीसाठी भारतात संघटित साखळी उभी केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. याव्यतिरिक्त अमली पदार्थ तस्करीशी संबंधित गुन्हेही सलीमविरोधात नोंद आहेत.

मुलगा, साथीदारास गतवर्षी अटक

गुन्हे शाखेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षी सलीमचा मुलगा ताहीर आणि विश्वासू साथीदार सामील सोहेल शेख यांना दुबईत अटक झाली, तेथील सरकारने दोघांना भारतात प्रत्यार्पित केले. या दोघांचीही सलीमप्रमाणे सांगली प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. या दोघांच्या अटकेमुळे सलीम बिथरला आणि त्याने दुबई सोडून अन्य देशांमध्ये आसरा शोधला.

अमली पदार्थाचा बादशहा कोण होता सलीम?

आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांशी समन्वय साधून देशात अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, परदेशातील तस्करी करणारा सलीम १० वर्षापूर्वी दक्षिण मुंबईतील अनेक किरकोळ अमली पदार्थ विक्रेत्यांपैकी एक होता. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने काही व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केली. २०१६ मध्ये दुबईत पसार झाल्यानंतर तेथून भारतात ड्रग्जची पाळेमुळे रुजवली.  परदेशातील वास्तव्यात त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संधान झाले का? दाऊद टोळीनेच त्याला हेतुपुरस्सर मध्यपूर्वेत स्थायिक केले का? या दृष्टिकोनातून तपास केला जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts