• Home
  • महाराष्ट्र
  • साहेब, हप्ता देतो, पण गाडी सोडा; वाळूमाफियाचा व्हिडिओ व्हायरल
गुन्हा

साहेब, हप्ता देतो, पण गाडी सोडा; वाळूमाफियाचा व्हिडिओ व्हायरल

sand mafia viral video

sand mafia viral video : “काय साहेब, माझा गाडीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही म्हणून मला पकडता का? अहो, या मार्गावर 100 गाड्या चालतात, त्या तुम्हाला हप्ता देतात. माझी चूक झाली, मी देखील तुम्हाला लवकरच हप्ता देतो, पण माझी गाडी सोडा. ही वाक्यं आहेत एका वाळूमाफियाची! हप्ता देतो, पण गाडी सोडा, असं कॅमेऱ्यासमोर ओरडून सांगणाऱ्या या वाळू वाहतूकदाराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पण या प्रकारामुळं वाळू माफिया पोलिसांसह प्रशासनाचा कसा पाणउतारा करतात हे मात्र चव्हाट्यावर आलंय.

हिंगोली तालुक्यातील सेनगाव-गोरेगाव मार्गावर हा असा प्रकार घडला. या वाळू माफियाचं नाव आहे संजय गोटे असं आहे. या वाळू माफियाचा हा माज पाहून तालुक्यात महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकाखाली त्यांची कशी मुजोरी वाढलीये याचं हे ढळढळीत उदाहरण होय. मिळालेल्या माहितीनुसार, या वाळू माफियानं हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत भर रस्त्यात अर्धा तास हुज्जत घातली.

मद्यधुंद वाळू माफियांची पोलिसांसोबत हुज्जत

माझा हप्ता आला नाही म्हणून पकडता का? असा थेट सवालच त्यानं अधिकाऱ्यांना केला. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक डंपर अडवला. मात्र कारवाई सुरू असतानाच एका बोलेरो जीपमधून आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील दोन वाळू माफियांनी थेट त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मात्र एक गोष्ट इथं नोंद करून घेण्यासारखी आहे. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेल्या व्हिडिओमध्ये हा वाळू माफिया पोलिसांसमोर हात जोडून थेट हप्तेखोरीची कबुली देतोय त्याचं काय?

वाळू माफियाला पोलिस अधिकारी म्हणतात दादा, भाऊ अध्यक्ष..

“मी तुम्हाला लवकरच हप्ता देतो, पण माझी गाडी सोडा,” असं तो कॅमेऱ्यासमोर ओरडून ओरडून सांगतोय. याचाच अर्थ परिसरात मोठी हप्तेखोरी सुरू असल्याचं चव्हाट्यावर आलंय. या अशा मुजोर वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याऐवजी घटनास्थळावरचे पोलीस अधिकारी मात्र त्याला ‘दादा’, ‘भाऊ’, ‘अध्यक्ष’ अशा हाक मारत, अंजारत-गोंजारत “राडा करू नका” म्हणून विनवण्या करताना दिसतायत.

वाळूनं भरलेल्या डंपरसह लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त

उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय गोटे आणि समाधान राऊत या दोन्ही वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी वाळूनं भरलेल्या डंपरसह लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय. संजय गोटे यानं याबाबत आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीये. कुठं ना कुठं तरी पोलिसांकडून हप्तेवसुली होत असल्याच्या कारणामुळंच हे वाळू माफिया राजरोसपणे पोलिसांना साहेब, हप्ता देतो, पण गाडी सोडा, अशी ऑफर देताना दिसून येतंय.

ज्याअर्थी धूर निघतोय म्हणजे कुठं तरी नक्कीच आग लागलीय

एखादा वाळूमाफिया पोलिसांना थेट अशी ऑफर देतो आणि पोलिस मात्र त्याला ‘दादा’, ‘भाऊ’, ‘अध्यक्ष’ अशा हाक मारत, “राडा करू नका” म्हणून विनवण्या करतात म्हणजे याठिकाणी खरंच हप्तेखोरी होतेय आणि म्हणूनच हे वाळू माफिया पोलिसांवर असा आवाज चढवतात, असं म्हणायला वाव आहे. एकूणच काय, तर पोलिसांनी त्यांच्या विषयी घेतलेली मवाळ भूमिका पाहाता कुठं तरी पाणी मुरतंय. असंच म्हणावं लागेल. कारण ज्याअर्थी धूर निघतोय म्हणजे कुठं तरी नक्कीच आग लागलेली असणार? असं या प्रकरणातून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts