• Home
  • महाराष्ट्र
  • तासगावजवळ भीषण अपघात: दुचाकी-कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
ताज्या बातम्या

तासगावजवळ भीषण अपघात: दुचाकी-कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

WhatsApp Image 2025 09 09 at 19.11.40 00053663

सांगली येथील तासगाव-भिलवडी मार्गावर तासगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर, चेतना पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. वॅग्नार कार (MH 10 EA 6540) आणि दुचाकी (MH 10 B 7174) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेने तासगाव आणि पलूस तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅग्नार कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते. यापैकी स्वाती अमित कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगावमार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला.

तासगावजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्षबागेत कोसळली. या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार (वय 57), आशाताई शिवाजी सुतार (वय 55) आणि त्यांचा पाच वर्षांचा नातू वैष्णव ईश्वर सुतार (रा. बुर्ली, ता. पलूस) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही काकडवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. वॅग्नार कारमधील चार शिक्षक—पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, हे चौघेही बचावले असल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केले. तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे तासगाव आणि पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे., एका वृद्ध दांपत्यासह त्यांच्या पाच वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. याशिवाय, पुरस्कार सोहळ्याहून परतणाऱ्या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्याने शिक्षक समुदायातही दुख: व्यक्त केले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. मात्र, यामागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts