Mundhwa land scam Kharge Committee report : मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या खारगे समितीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या गाजावाजात स्थापन झालेल्या या समितीला देण्यात आलेली एक महिन्याची मुदतवाढ काल संपली असली, तरी चौकशी अहवाल अद्याप सादर झालेला नाही.या प्रकरणात पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया इंटरप्राइजेस एलएलपी’ या कंपनीने मुंढवा परिसरातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात असलेली सुमारे ४० एकर शासकीय जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे राज्यभरात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
हेही वाचा – राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर रीक्षा-टॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 ठार तर सुमारे 10 जखमी
चौकशी की वेळकाढूपणा? विजय कुंभारांचा सवाल
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खारगे समितीच्या चौकशीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “ही चौकशी सत्य बाहेर काढण्यासाठी नसून, वेळ मारून नेण्यासाठीच रचण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.समितीच्या बैठका होत आहेत, फाईली फिरत आहेत, मात्र प्रत्यक्ष निष्कर्ष किंवा ठोस अहवाल समोर येत नाही, हे गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज बैठक, पण पुन्हा मुदतवाढीची शक्यता
आज या संदर्भात समितीची आणखी एक बैठक होणार असली, तरी समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या मुदतवाढींमुळे या चौकशीची विश्वासार्हता कमी होत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.











