Mumbai | मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण आता मुंबईमध्ये 10% पाणी कपात करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) घेतला आहे. येत्या 15 मे पासून संपूर्ण मुंबई शहरात 10% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
हेही वाचा – पाकिस्तानच्या शहजाद भट्टीला महाराष्ट्र ATS ने दिला मोठा झटका; रेड टाकत केला पर्दाफाश
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी कपात करण्याचा का घेतला निर्णय?
पाणी कपातीबाबत प्रशासनाने नागरिकांना अलर्ट दिला आहे. बीएमसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, संपूर्ण मुंबई शहरात 15 मे पासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. कारण पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्यामुळे पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
बीएमसीने सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, संभाव्य एल निनो आणि आयओडी (हिंदी महासागर द्विध्रुव) घटनांमुळे पुढील वर्षीचा मान्सून कमजोर राहील, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबईकरांना अधिकाऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईकरांना बीएमसीने पाण्याच्या वापराबाबत काही सल्ले देखील दिले आहेत. बीएमसीने सांगितलं आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता पाणी जपून वापरावे. सर्व घरे आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाण्याच्या पाईपलाईन आणि कालव्यांची तपासणी करावी. जर पाण्याची गळती आढळली तर तिची तात्काळ दुरुस्ती करावी. यामुळे पाण्याची बचत होईल आणि जलप्रदूषणही कमी होईल. तसेच नागरिकांनी पाणी वाचवण्यासाठी भांड्यांमध्ये पाणी साठवून घरगुती कामांसाठी वापरणे, अंघोळीसाठी बादलीचा वापर करणे, नळ सतत चालू ठेऊ नये अशा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देखील बीएमसीने दिला आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील 7 तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे बीएमसीने खबरदारी म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.












