Amit Shah On Mamata Banerjee | काल (23 एप्रिल) पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी कोलकाता (Kolkata) येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी मोठा दावा केला. बंगालमध्ये (Bengal) पहिल्या टप्प्यात भाजपची (BJP) मोठी आघाडी असल्याचा दावा अमित शाह यांनी केला आहे.
हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान, गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही विक्रमी टर्नआउट
बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार? काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह म्हणाले की, “काल बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचंड मतदान झाले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही आणि हे सुनिश्चित केल्याबद्दल मी निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांचे आभार मानतो. पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या बंगालच्या सर्व मतदारांचे मी अभिनंदन आणि आभार मानू इच्छितो. तुम्ही भीतीकडून विश्वासाकडे जाण्याचा प्रवास इतक्या यशस्वीपणे सुरू केला आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदारही भीतीकडून विश्वासाकडे जाण्याचा हा प्रवास पुढे चालू ठेवतील”, असं अमित शाह म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, भाजपने मतदानाच्या पहिल्या टप्प्यात लक्षणीय आघाडी घेतली असून, त्यांना याबाबतचा प्रतिसादही मिळाला आहे. भाजप पहिल्या टप्प्यातील 152 पैकी 110 जागा जिंकणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यासह भाजप बहुमताचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दीदी बंगाल सोडून जाणार असून भाजप येणार आहे. बंगालच्या नागरिकांमधील भीती नाहीशी होणार असून विश्वास निर्माण होणार आहे, असं अमित यांनी म्हटलं आहे.
बंगालच्या निवडणुका जिंकल्यानंतर कोणताही बाहेरील व्यक्ती मुख्यमंत्री होणार नाही. भाजप केवळ बंगालमध्ये जन्मलेल्या व्यक्तीलाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करेल. ते बंगाली बोलतील आणि बंगालसाठी काम करतील, असं आश्वासनही अमित शाह यांनी दिलं
अमित शाह यांनी टीएमसीवर निशाणा साधत सांगितलं की, बंगालमध्ये टीएमसी सरकार स्थापन होणार नाही. ममता बॅनर्जी यांचा पुतण्या कधीही बंगालचा मुख्यमंत्री होणार नाही. तृणमूल काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार हे निश्चित आहे. भाजप बंगालमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. तसेच जर बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले तर ते टीएमसीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करेल. भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. आम्ही गुन्हेगारी टोळी उद्ध्वस्त करू आणि महिलांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असंही अमित शाह यांनी सांगितलं.










