Tilgul significance on Makar Sankranti : हिंदू पंचांगानुसार आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार महत्वपूर्ण सण म्हणजे मकर संक्रांती. दरवर्षी मकर संक्रांती हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा सण इतर सणांपेक्षा खास आणि वेगळा मानला जातो. कारण मकर संक्रांत ही तिथीनुसार नव्हे तर सूर्याच्या स्थितीनुसार साजरा करण्यात येणारा सण आहे. या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणूनच मकर संक्रांत या दिवशी धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
काय आहे उत्तरायण काळ
मकर संक्रांतच्या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेला भ्रमण करतो. त्याला उत्तरायण म्हणतात. हिंदू धर्मामध्ये उत्तरायणाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या शुभ काळात दान, जप, तप आणि धार्मिक कर्म केल्यास फायदा होतो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान, देवपूजा आणि दानधर्म करण्याची परंपरा सतत चालत आलेली आहे. आताच्या काळात देखील या शुभ काळात देवधर्म प्राधान्याने केले जातात.
हे ही वाचा : या मकर संक्रांतीला वाण म्हणून द्या या वस्तू; जाणून घ्या वाण देण्यामागील परंपरा
तिळगुळाचे महत्व
मकर संक्रांतीला तिळगुळाला अत्यंत महत्व आहे. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देण्याचे काम तीळ आणि गुळ करतात. हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मकर संक्रांतीचे औचित्य साधून समाजात गोडवा, आपुलकी आणि सलोखा टिकवण्याचा संदेश तिळगुळाच्या माध्यमातून दिला जातो. म्हणूनच आपण या दिवशी ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका‘ असे ब्रीदवाक्य वापरले जाते.
‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला‘
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे फक्त सणापुरता मर्यादित नसून ती एक जीवनशैलीची शिकवण आहे. तीळ म्हणजे थोडंसं कडू, आणि गूळ म्हणजे थोडंसं गोड. म्हणजे आपल्या आयुष्यसारखंच. आयुष्यात चांगले वाईट असे अनुभव येतच असतात. या अनुभवांतून शिकवण घेऊन गोड बोलणे आणि माणुसकी जपणे हाच अर्थ या म्हणीतून लागतो. पूर्वीच्या काळी भावाभावात किंवा नातेवाईकांमध्ये कितीही मतभेद असले तरीही सणासुदीला कडवटपणा बाजूला सारून गोड बोलण्याची परंपरा होती. परंतु आताच विचार केला तर हा कडवटपणा तसाच राहिलेला दिसतो. कोणीही माघार घेऊन गोड होण्यास तयार होत नाही.
डिजिटल माध्यमं आणि संवादातील कडूपणा
आजकालच्या अस्थाव्यस्त अशा धावपळीच्या जीवनात आपण अत्यंत बिझी होत चाललो आहोत. आपण जरी आजकाल सोशल मीडियावर सक्रिय असतो तरीही आप्तेष्ठांसोबत फारसे बोलणे होत नाही. किंवा आपण बऱ्याचदा बोलणे टाळतो. नाही तर असं म्हणता येईल की, आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून जोडले गेलो, परंतु आपल्यातला गोडवा कमी झालाय. आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून नातेवाईकांना शुभेच्छा पोस्ट पाठवतो. परंतु या पोस्टला संवादाची काय गोडी येणार ? त्या तिळगुळाची गोडी जिभेवर कशीकाय रुळणार ?
या संक्रांतीला काय कराल
या सोशल मीडियाच्या जगात आपला कुटुंबीयांसोबतचा वेळ कुठेतरी हरवत चालला आहे. एकाच घरात एकाच ठिकाणी बसून देखील आपला संवाद आता तुटत चालला आहे. परंतु तुम्ही या मकर संक्रांतीच्या सणाला सोशल मीडिया काही क्षणासाठी बाजूला ठेऊन नातेसंबंध जपू शकतात.












