Ajit Pawar plane crash : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज सकाळच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर महाराष्ट्रात आक्रोश करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील जनता देखील भावुक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अचानक झालेल्या या अकाली अपघातात अजित दादांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादा आपली सर्व कामे उरकून मुंबईहुन बारामतीत रवाना होणार होते. परंतु हा अपघात घडला आणि महाराष्ट्राला शिस्तप्रिय, वेळ पाळणारा नेता आज गमवावा लागला. हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
कसा घडला अपघात
आज बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभेसाठीच मुंबईतील सर्व कामे उरकून दादा बारामतीला निघाले होते. बारामनातीत लँडिंग करतानाच 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात घडला. हा अपघात बारामती एअरपोर्टहून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घडला. ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर लँड करता आले नाही. तर हे विमान एअरपोर्ट पासून 2 ते 3 किलोमीटर लांब जमिनीवर उतरवण्यात आले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी खोलगट असा भाग होता. या जागेच्या आजूबाजूला झाडे, झुडपे आणि ऊस शेती होती. आणि त्याशेजारी वस्ती होती.
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांचे विमानावरचं नियंत्रण सुटलं
लियरजेट 45 XR या विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथून बारामतीत जाण्यासाठी निघाले होते. या विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे देखील होते. सकाळी 8.40 मिनिटांनी विमान बारामती एअरस्ट्रीपच्या जवळ होते. परंतु त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला. 8.46 मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांचे विमानावरचं नियंत्रण सुटलं. आणि विमान जमिनीवर कोसळलं. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले अन विमानाला भीषण आग लागली. विमानाचा पूर्णपणे जळून कोळसा झाल्याचं यावेळी बघायला मिळालं.
घड्याळ हीच ठरली शेवटची ओळख
हा अपघात घडल्यानंतर विमानाचा पूर्णपणे कोळसा झाला. या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य होते. त्यावेळी अजित पवार यांचा मृतदेहाची ओळख पटवणे देखील मुश्किल होते. परंतु त्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने त्यांची ओळख पटवून देण्यास मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा विभागला गेला. तेव्हा अजित पवार यांच्या वाट्याला घड्याळ हेच चिन्ह आले होते. आणि आज जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळाने पटली. शेवटी घड्याळ हीच त्यांची शेवटची ओळख ठरली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.












