Deadly attack on Sharad Butte : सध्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यासाठी मतदान (ZP and Panchayat Samiti Elections) प्रक्रिया सुरु आहे. अशातच पुण्याच्या (Pune ZP Election) खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट येथे जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे (Sunita Butte) यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून (BJP) अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी (Ajit Pawar Ncp) काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – राज्यात ‘मिनी-विधानसभे’साठी मतदान सुरु; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
हल्लेखोरांकडून अचानक हल्ला, शरद बुट्टे गंभीर जखमी
शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात असून, हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले आहे. शरद बुट्टे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे.
राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
जुन्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












