• Home
  • राजकारण
  • ‘ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले’; सत्ताधारी आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप
Pune

‘ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले’; सत्ताधारी आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप

'EVM machine hacked'

EVM machine hack : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवल्यानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून २५ ते ३५ लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – धक्कादायक! अजितदादांच्या निधनाचा दुखवटा, अन् ७५ शाळांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्राची खैरात वाटप

“कोणीही माझ्यामुळे मोठे झाले असे वाटत असेल तर २०२९ ला माझ्या विरोधात उभे राहा,” असे आव्हान देत शेळके यांनी आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, मात्र वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, असा स्पष्ट संदेश दिला. दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबाराला हजर राहणे बंधनकारक असल्याचे सांगत “पक्षाचे काम हे घरचे काम नसून जनतेची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार दीड लाख मताधिक्याने विजयी होईल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास माजी मंत्री मदन बाफना, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. निवडणुकीतील भव्य यशानंतरही आनंदोत्सव टाळून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts