Baramati Byelection | बारामती विधानसभा पोटनिवडणूकासाठी (Baramati Byelection) सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) मार्ग मोकळा झाला आहे. कारण काँग्रेस (Congress) पक्षाने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकासाठी आकाश मोरे (Akash More) यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर आता काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली असून आता सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा – कोर्टात बदलले सूर! न्यायाधीशांच्या प्रश्नावर अशोक खरातने जोडले हात, कोर्टात नेमकं काय घडलं
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून घेतली माघार
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करत भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, भाजपचा राजकीय विरोधक म्हणून आम्ही ही पोटनिवडणूक लढत होतो. एक वैचारिक भूमिका म्हणून आम्ही भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या पक्षाकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी बारामतीत प्रचार करण्यास सुरूवात केली होती. मात्र, अजित पवार हे राज्याचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे या भावनिक भूमिकेमुळे आम्ही या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
आज सुनेत्रा पवारांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधत चर्चा केली. त्यांनी मला या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली. सोबतच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. तसेच काँग्रेसच्या विविध नेत्यांसोबत महायुतीच्या अनेक नेत्यांनी फोनवरून संपर्क साधला होता. रोहित पवारांनीही आमची भेट घेत आमच्यासोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी देखील माझ्यासोबत फोनवरून संवाद साधला. त्यामुळे आम्ही या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं.
हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर सडकून टीका
पुढे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपसारख्या विषारी पक्षासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राहू नये. सत्तेसाठी भाजपसमोर लाचार होऊ नये. अजितदादा हे एक मोठे नेते होते. अजितदादांचा नेमका अपघात आहे की घातपात? या प्रकरणात गुन्ह्याची नोंद का होत नाही. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. जर या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसेल तर सरकार नक्कीच काहीतरी लपवाछपवी करत आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.












