Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • बायकोची परवानगी घेतल्याशिवाय दारू पिणे गुन्हा? थेट जेलमध्ये रवानगी
Top News

बायकोची परवानगी घेतल्याशिवाय दारू पिणे गुन्हा? थेट जेलमध्ये रवानगी

Wife's Permission to Drink Alcohol

Wife’s Permission to Drink Alcohol : राज्यातील अनेक महिला आपल्या दारुड्या नवऱ्यांनी त्रस्त आहेत, पण अशातच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आणि बायकांच्या आशा पल्लवीत झाल्या, कारण सध्या सोशल मीडियावर ‘बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल’ अशा आशयाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या बातम्यांचे मूळ स्वरूप आणि भारतीय कायद्यातील बदल समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS या नवीन कायद्याने ब्रिटिशकालीन ‘भारतीय दंड संहिता’ म्हणजेच IPC ची जागा घेतली आहे. या बदलामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषतः मद्यपान करून पत्नीचा छळ करणाऱ्या पतींसाठी आता कायद्याचा फास अधिक घट्ट झाला आहे. सोशल मीडियावर “बायकोची परवानगी” या शब्दावरून चर्चा सुरू असली, तरी कायद्याचा मुख्य भर हा दारू पिऊन होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आहे.

आता हा नेमका कायदा काय आहे? हेही पाहूयात, जुने ‘आयपीसी ४९८-अ’ हे कलम आता BNS च्या कलम ८५ मध्ये रूपांतरित झाले आहे. या कलमानुसार, जर पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहित महिलेला ‘क्रूर वागणूक’ दिली, तर तो गुन्हा मानला जाईल. या गुन्ह्यासाठी पतीला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. यात शारीरिक छळासोबतच मानसिक छळाचाही समावेश आहे.

बायकोची परवानगी घेतल्याशिवाय दारू पिणे गुन्हा?

तर नव्या कायद्यानुसार आता खरंच दारु प्यायला बायकोची परवानगी घ्यावीच लागणार आहे का? हेही स्पष्ट करुयात, कायद्याच्या पुस्तकात “बायकोची परवानगी घेतल्याशिवाय दारू पिणे गुन्हा आहे” असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, या कायद्यामुळे अनेक परिस्थितीत पती अडचणीत येऊ शकतो, जर पत्नीने पतीला दारू पिऊन घरी न येण्याबद्दल स्पष्ट बजावले असेल, कारण त्यामुळे वाद किंवा भीतीचे वातावरण निर्माण होते. आणि तरीही पती दारू पिऊन येऊन गोंधळ घालत असेल, तर ती ‘क्रूरता’ मानली जाऊ शकते. दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करणे, टोमणे मारणे, धमकावणे किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेणे या कृती कलम ८५ अंतर्गत गंभीर मानल्या जातात.

महिलांना अधिक संरक्षण देण्यासाठी या तरतुदी

सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सुमारे ४०% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमागे ‘दारू’ हे मुख्य कारण आहे. अनेकदा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करतात किंवा कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतात. अशा मद्यपी पतींना चाप लावण्यासाठी आणि महिलांना अधिक संरक्षण देण्यासाठी या तरतुदी अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

केवळ मद्यपान करणे हा गुन्हा ठरत नाही

कायदे तज्ज्ञांच्या मते, जर एखादी व्यक्ती शांतपणे मद्यपान करत असेल आणि त्यातून कुटुंबाला किंवा पत्नीला कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास होत नसेल, तर केवळ मद्यपान करणे हा गुन्हा ठरत नाही. हा कायदा मद्यपानावर बंदी घालणारा नसून, दारूमुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणारा आहे. नवीन कायद्यानुसार, पिडीत पत्नीला आता अधिक प्रभावीपणे कायदेशीर दाद मागता येईल, आपला छळ होत असल्यास ती पोलिसांत तक्रार करू शकते. न्यायालय पतीला पत्नीपासून दूर राहण्याचे किंवा छळ न करण्याचे आदेश देऊ शकते. घरगुती हिंसाचाराच्या परिस्थितीत पत्नीला पोटगी आणि सुरक्षित निवासाचा हक्क मिळतो.

परवानगीशिवाय दारू प्यायल्यास जेल

सोशल मीडियावरील “परवानगीशिवाय दारू प्यायल्यास जेल” ही हेडलाईन थोडी अतिरंजित असली, तरी त्यामागील गांभीर्य नाकारता येणार नाही. जर तुमच्या मद्यपानामुळे तुमच्या पत्नीला किंवा कुटुंबाला त्रास होत असेल, तर भारतीय न्याय संहितेचे कलम ८५ तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खाऊ घालू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशानं पिताय, आमचं काही जात नाही, पण मद्यपानापेक्षा कौटुंबिक शांततेला प्राधान्य देणे हे तुमच्याही आणि तुमच्या कुटुंबाच्याही हिताचे ठरेल. म्हणजेच ‘दारु सोडा संसार जोडा’ हे फेमस नाटकाचं टायटल जरा वेगळ्या पद्धतीनंही बघता येईल, मापात प्या, ऐटीत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts