• Home
  • मनोरंजन
  • सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे ९३ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा
Top News

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे ९३ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा

Asha Bhosle death

Asha Bhosle death : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची प्रकृती अचानक खालावल्याची बातमी काल समोर आली होती. देशातील विविध भाषांमध्ये लाखो गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनात अमिट स्थान निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील नामांकित ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने सर्वजन चिंताग्रस्त होते. मात्र, आता दुःखद बातमी समोर आली आहे. ९३ व्या वर्षी आशा भोसले (Asha Bhosle Passes Away) यांची प्राणज्योत मालवली आहे.

हेही वाचा – आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करताच पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट; म्हणाले, “मी चिंतेत आहे…”

आशा भोसले यांनी मराठीसह हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक अजरामर नाव कमावले आहे. त्यांच्या खास आवाजाने आणि विविधतापूर्ण गायनशैलीने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मात्र, हा आवाज आता कायमचा थांबला आहे. त्यांच्या अशा अचानक निधनामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

उद्या ४ वाजता शिवाजी पार्क येथे पार्थिवावर अंतसंस्कार

आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या. ‘मल्टी ऑरगन फेल्युअर’मुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉ. समदानी यांनी सांगितलं. उद्या सोमवारी (13 एप्रिल) दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

भजन ते कॅबरे, सर्व प्रकारच्या गाण्यांना साजेसा आवाज

8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या 90 व्या वर्षापर्यंतही त्यांचं गायन सुरू होतं. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या कलाकारांसोबत त्यांनी गाणी गायली होती. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीसाठी नामांकन मिळालं होतं.

आशा भोसले यांनी 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली

दिल्लीच्या मदाम तुसाद म्युझियममधील आशा भोसले यांचा पुतळा उभारण्यात आला होता. आशा भोसले यांनी 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. आशा भोसले यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्या काळाबरोबर चालायच्या. फक्त जुन्याच गोष्टी चांगल्या असतात असा हट्ट त्यांनी कधीही धरला नाही. त्यांच्या आवाजात भजनं जेवढी सुरेल वाटतात तेवढाच त्यांचा आवाज कॅबरे सारख्या गाण्यांनाही शोभतो.” “गायनातीव वैविध्य ही त्यांची ताकद आहे आणि त्यामुळेच त्या इथपर्यंत पोहोचल्या. उदाहरणार्थ, ‘आगे भी जाने ना तू…’ हे गाणं पाहिलं तर, त्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे शिवाय ते एक नाईट क्लब साँगसुद्धा आहे. आशा भोसलेंच्या या गाण्यात विलक्षण वेदना आहेत. नाईट बारमध्ये चित्रित केलेल्या गाण्यात अशा भावना ओतणं हे अवघड काम आहे, जे आशा भोसले यांनी करून दाखवलं.”

सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य

भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान नक्षत्र आणि आपल्या अष्टपैलू आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

1943मध्ये ‘माझे बाळ’ या मराठी चित्रपटातून त्यांचा प्रवास सुरू

पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933रोजी सांगली येथे झाला. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर, कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी गायनास सुरुवात केली. 1943मध्ये ‘माझे बाळ’ या मराठी चित्रपटातून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि 1948च्या चुनरिया चित्रपटाने त्यांना हिंदी सिनेसृष्टीची दारे उघडून दिली. आशा भोसले म्हणजे केवळ एक नाव नसून तो संगीताचा एक इन्सायक्लोपीडिया होता. त्यांनी पॉप, गझल, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत अशा सर्व शैली लीलया हाताळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts