Kalyan Cyber Fraud: कल्याणमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासाच्या नावाखाली भीती दाखवत सायबर भामट्यांनी ही मोठी आर्थिक लूट केल्याचे उघड झाले आहे.
कल्याण | प्रमोद तांबे, प्रतिनिधी
कल्याण शहरात सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून सायबर भामट्यांनी भीती निर्माण करत ही मोठी आर्थिक लूट केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुलकर्णी (वय ८२) या ज्येष्ठ महिलेला आरोपींनी फोन करून स्वतःला तपास यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवले. पहलगाव दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका संशयिताकडे तुमचा मोबाईल नंबर सापडल्याचा बनाव करून त्यांनी आजींना घाबरवले.
हेही वाचा: मंगरूळमध्ये युवकाची निर्घृण हत्या; डोक्यात वार करून ठार, मृतदेह फरपटत नेल्याचा संशय
यानंतर आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे सांगत सलग पाच दिवस फोनवर संपर्क ठेवला आणि मानसिक दबाव निर्माण केला. तुमच्या बँक खात्यांची तपासणी सुरू असल्याचे कारण देत RTGS आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत आजींनी टप्प्याटप्प्याने ७३ लाख ३० हजार रुपये आरोपींच्या खात्यांमध्ये वर्ग केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सेवानिवृत्तीनंतरची बचत तसेच काही उसने घेतलेली रक्कमही यात वापरण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
सायबर पोलिसांचे आवाहन
‘डिजिटल अरेस्ट’, तपास किंवा भीती दाखवून पैशांची मागणी करणारे फोन आल्यास कोणतीही आर्थिक व्यवहार न करता त्वरित पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.












