Dharashiv Crime News: धाराशिव मधील मंगरूळ परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात जड वस्तूने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, मृतदेह सुमारे काही अंतरावर फरपटत नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव तालुका | वैभव पारवे, प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील मंगरूळ परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, कृष्णा आनंद साठे (वय ३६, रा. मंगरूळ) यांचा मृतदेह तुळजापूर–अक्कलकोट मार्गावर, मंगरूळपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील पुलाजवळ आढळून आला. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली.
हेही वाचा: MPSC नंतरही करिअर थांबणार नाही! ‘निपुण सेतू’ उपक्रमाची घोषणा; नेमका काय आहे? पाहा एका क्लिकवर
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून साठे यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाच्या पाहणीत मृतदेह सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर फरपटत नेण्यात आल्याचे आढळून आले असून, ही हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
तपासासाठी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
हत्येमागील नेमके कारण काय, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मृतदेह दूरवर का नेण्यात आला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.












