मुंबई MI vs PBKS : आयपीएल 2026 चा 24वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात पंजाब किंग्सनं एकही सामना न गमावता विजयाची मालिका कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 मध्ये कामगिरी तितकी चांगली झालेली नाही. मुंबईनं आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी फक्त एक सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सची विजयाची मालिका थांबवू शकेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल (MI vs PBKS).
पंजाब किंग्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर :
सर्वप्रथम पंजाब किंग्सबद्दल बोलूया, जो सध्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी चारपैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सात गुण आहेत. केकेआरविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला, त्यामुळं त्यांना एक गुण मिळाला. हा संघ आतापर्यंत अपराजित असून त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. पंजाबचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या फलंदाजीतील खोली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग हे दोन युवा फलंदाज डावाची सुरुवात करतात, तर कर्णधार श्रेयस अय्यर स्वतः फलंदाजीला येतो. या संघात जगातील काही सर्वोत्तम फिनिशर्सचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचे उत्कृष्ट मिश्रण आहे, जे संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे आहे.
मुंबईचे सलग तीन पराभव :
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी हंगामातील पहिला सामना जिंकला होता, परंतु त्यानंतर त्यांनी तीन सामने गमावले आहेत. चार सामन्यांमधून त्यांच्या नावावर केवळ एक विजय आणि दोन गुण आहेत. संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून संघर्ष करत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला आज खेळणं कठीण जाईल. सूर्यकुमार यादवलाही धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केवळ संघच नाही, तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहसुद्धा विकेट्ससाठी आतुर आहे. चार सामने खेळूनही त्याला अद्याप यश मिळालेलं नाही, ज्यामुळं संघ बॅकफूटवर गेला आहे.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल :
मुंबई इंडियन्स आणि पंजाह किंग्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. येथील खेळपट्टी लाल मातीची बनलेली आहे, ज्यामुळं गोलंदाजांना चांगला बाऊन्स मिळतो आणि चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. या मैदानावर अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने होतात, त्यामुळे चाहत्यांना आजसुद्धा तशाच सामन्याची अपेक्षा असेल. या स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 धावा आहे. मात्र, मुंबई आणि बंगळुरुकडे असे शक्तिशाली फलंदाज आहेत जे कोणत्याही सामन्यात 250 धावा करु शकतात.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
मुंबई इंडियन्स : रॉबिन मिंज, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेलटन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), राज बावा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, मिशेल सँटनर, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, जसप्रित बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, एएम गजनफर, रघु शर्मा, मयंक रावत, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद सलाउद्दीन इजहार.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जानसन, शशांक सिंह, बेन ड्वारश्विस, नेहाल वढेरा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, मिचेल ओवेन, कूपर कॉनली, अजमतउल्लाह ओमरजाई, लॉकी फर्ग्युसन, विजयकुमार वैशक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, विष्णु विनोद, जेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, विशाल निषाद, सूर्यांश शेडगे, पायला अविनाश, मुशीर खान, हरनूर सिंग.












