Solapur Murder Case: सोलापुरात रविवारी रात्री घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असून, तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर सदर बझार परिसरात घडलेल्या गर्भवती महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी बापू आरगोळ याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात ही घटना केवळ किरकोळ वादातून नव्हे तर पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक रागातून घडल्याचे समोर येत आहे.
मृत सोनी रामपुरे आणि आरोपी बापू आरगोळ यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. बापू हा सोनीच्या घराजवळच राहत होता. मात्र तो कोणतेही स्थिर काम करत नव्हता आणि त्याला व्यसनाचेही व्यसन होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: स्लिम होण्यासाठी ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? कोणतं आहे बेस्ट; जाणून घ्या एका क्लिकवर!
त्यामुळे सोनीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला आणि एप्रिल 2025 मध्ये तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी लावून दिला. यामुळे बापूच्या मनात राग आणि सूडाची भावना निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
घटनेचा थरारक प्रसंग
सोनी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. रविवारी दुपारी आरोपीने तिच्या घरासमोर मोठ्या आवाजात संगीत लावून गोंधळ घातला. गर्भवती असल्याने सोनीला त्रास होऊ नये म्हणून तिच्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. याच वादातून परिस्थिती गंभीर झाली आणि आरोपीने रागाच्या भरात हिंसक पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.
निर्घृण हल्ला आणि मृत्यू
आरोपीने आधी सोनीच्या आईला ढकलून दिले आणि नंतर सोनीवर हल्ला केला. त्याने तिचे तोंड दाबून गळा आवळला आणि तिचे डोके भिंतीवर आपटले, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सोनी रामपुरे यांचा आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
घटनेनंतर आरोपी बापू सुरेश आरगोळ (वय 26) फरार होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सदर बझार पोलिसांनी त्याला रात्री अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.












