Minor Pregnancy Case Solapur: सोलापूर शहरातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३४ अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीची माहिती दडवून ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रांसह सिव्हिल हॉस्पिटल, श्री मार्कंडेय रुग्णालय, महिला शासकीय रुग्णालय आणि स्पॅन हॉस्पिटलसह अन्य काही रुग्णालयांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही बाब सुमारे दोन वर्षानंतर उघडकीस आली असून, मोहोळ (Mohol) येथील एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे ९ एप्रिल २०२६ रोजी पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीची माहिती संबंधित रुग्णालयांनी पोलिसांना कळवली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता संबंधित मुलींचे आई- वडील, पती, सासू- सासरे तसेच काही रुग्णालयांतील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या जेलरोड, जोडभावी पेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत.
राज्यभरातील आणि बाहेरील मुलींचाही समावेश
तपासात हेही समोर आले आहे की काही अल्पवयीन मुली या परजिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील तसेच सोलापूर ग्रामीण भागातील होत्या. त्या प्रसूतीसाठी सोलापूर शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल झाल्या होत्या. या मुली शहरात कशा आणल्या गेल्या, याचा तपासही सुरू आहे.
काही प्रकरणांची माहिती
एका प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगी सोलापुरातील स्पॅन हॉस्पिटल आणि भावनाऋषी आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्या वेळी तिचे वय १७ वर्षे ९ महिने होते. या प्रकरणात कुटुंबीयांसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या प्रकरणात १७ वर्षे ११ महिने वयाच्या मुलीची प्रसूती शासकीय रुग्णालयात झाली होती. यातही कुटुंबीय आणि संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणांमध्येही अल्पवयीन विवाहित मुलींच्या प्रसूतीदरम्यान संबंधित रुग्णालयांनी पोलिसांना माहिती न दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.












