Mamata Banerjee Statement : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची (Trinamool Congress) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे भाजपने (BJP) येथे अभूतपूर्व आघाडी घेतली असून तृणमूलची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार भाजपाने बहुमताचाही आकडा पार केला असून तृणमूल काँग्रेसने शंभरीही गाठलेली नाही. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचं आवाहन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात आज एक व्हिडिओ पोस्ट (Video Post) केला असून भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं ‘सुंभ जळाले पण, पीळ नाही जात’, असं म्हणण्याची वेळ आलीय.
हेही वाचा – थलपती विजय बनला तामिळनाडूचा ‘जननायक’; पहिल्याच निवडणुकीत TVK ला कसा मिळाला ब्लॉकबस्टर विजय? वाचा सविस्तर
मतमोजणी केंद्र सोडू नका कार्यकत्यांना आवाहन
ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेत व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत, “मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडू नये. हा भाजपचा प्लॅन आहे, मी कालपासून सांगतेय की त्यांना आधी आघाडीवर दाखवलं जाईल. त्यांनी अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली आहे.”
জরুরি বার্তা pic.twitter.com/Uc82oihwEL
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 4, 2026
सूर्यास्तानंतर आपणच जिंकू
“निवडणूक आयोग पूर्णपणे स्वतःच्या मर्जीन काम करत आहे आणि केंद्रीय दलेही त्यांच्यासोबत आहेत. पोलीस देखील केंद्रीय दलांसोबत काम करत आहेत. मी पक्ष कार्यकर्त्यांना सांगते की निराश होण्याची गरज नाही; सूर्यास्तानंतर आपलाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ २-४ फेऱ्या झाल्या आहेत, मतमोजणी १४-१८ फेऱ्यांपर्यंत चालते आणि आपणच जिंकू. कुणीही घाबरण्याची गरज नाही”, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
ममतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
“कल्याणीमध्ये अशी यंत्रे सापडली आहेत जिथे मेळ बसत नाहीये. केंद्रीय दलांच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसवर सर्व बाजूंनी अत्याचार केले जात आहेत. ‘एसआयआर’च्या माध्यमातून त्यांनी मते चोरण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही आपण १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत, जे नोंदवलं जात नाहीये. सगळं काही चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे”, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केला केला आहे.












