Balbharati Textbook Changes Alert : राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून बालभारतीच्या काही पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे जुनी पुस्तके खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे. बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2026 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामुळे या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकेच खरेदी करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीची सध्याची पुस्तके 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शेवटची असतील. त्यामुळे या वर्गांची जुनी पुस्तके खरेदी करताना आवश्यकतेनुसारच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांना खासगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वाध्याय पुस्तिकांवर 40 टक्के सवलत
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी “शिकू मराठी आनंदे” हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. तर इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी “करू मैत्री मराठीशी” हे पुस्तक दिले जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या विविध विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांवर 40 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन बालभारतीने केले आहे.
2026-27 पासून बालभारतीच्या काही पुस्तकांमध्ये बदल
– इयत्ता 2 री, 3 री, 4 थी आणि 6 वीची नवीन पुस्तके जून 2026 पासून
– इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी आणि 11 वीची सध्याची पुस्तके शेवटच्या वर्षात
– 9 वी ते 12 वींसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही बंधनकारक
– खासगी नोंदवहीची सक्ती शाळांना करता येणार नाही
– स्वाध्याय पुस्तिकांवर 40% सवलत
– पालकांनी जुनी पुस्तके खरेदी करताना सावध राहा
त्यामुळे पालकांनी जुनी पुस्तके खरेदी करण्यापूर्वी संबंधित वर्गाचा अभ्यासक्रम बदलत आहे का, याची खात्री करूनच पुस्तके खरेदी करावीत, अन्यथा ती पुढील वर्षी निरुपयोगी ठरू शकतात असं बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.












