Prashant Kishor Political Strategist : अजितदादांना प्रचारावेळी गुलाबी जॅकेट घालायला लावल्याने नरेश आरोरा चांगलेच चर्चेत आले होते. ते राष्ट्रवादीचे काम पाहत असताना वेगवेगळे कॅम्पियन राबवत होते. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा झाली. नरेश अरोरा आणि त्यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीवर गेल्या काही काळात गंभीर आरोप झाले होते. याच वादानंतर आता नरेश अरोरांना डच्चू देऊन प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार म्हणून काम देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आता पासूनच तयारी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेत डिझाईन बॉक्सच्या नरेश अरोरांना डच्चू दिला असून आता प्रशांत किशोर निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सांभाळणार आहेत. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने आपल्या सोशल मीडिया आणि निवडणूक ब्रँडिंगमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. देशातील सर्वात यशस्वी राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार म्हणून धुरा सांभाळणार आहेत.
हेही वाचा – आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? शेळकेंना मंत्रीपदाची लॉटरी?
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी राजकीय गणिते आणि पक्षाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या २ तासांच्या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. नरेश अरोरा यांच्या कार्यपद्धतीवर पक्षनेतृत्व नाराज असल्याने हा तातडीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
अजितदादांना गुलाबी जॅकेट घालून प्रचार करण्याचे सूचवले
नरेश अरोरा हे गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच जवळपास मागील १ ते दीड वर्षांपासून पक्षाचे सोशल मीडिया, ब्रँडिंग आणि रणनीतीचे काम पाहत होते. त्यांनीच प्रचारावेळी अजितदादांना गुलाबी जॅकेट घालून प्रचार करण्याचे सूचवले होते. मात्र करोडो रुपये खर्च करूनही पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
नरेश अरोरा हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय
नरेश अरोरा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचा थेट आरोप झाला होता. नरेश अरोरा यांना पक्षात आणण्यात आणि त्यांना कोट्यवधी रुपयांचे प्रसिद्धीचे कंत्राट देण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मोठी भूमिका होती. अरोरा हे पडद्यामागून काम करण्याऐवजी थेट निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याबाबतही पक्षात हालचाली किंवा विचार सुरू होता, असाही आरोप होत होता. याच सर्व गोष्टींमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचे काम नरेश आरोरा यांच्याकडून काढून घेत आता प्रशांत किशोर यांना दिल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत अनेक पक्षांची काम पाहिले आहेत. अनेक पक्षांना सत्ता देखील मिळाली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली
प्रशांत किशोर आय-पॅक – I-PAC चे संस्थापक असून ते भारतीय राजकारणातील सर्वात यशस्वी रणनीतीकार मानले जातात. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना एकत्र आणून 2015 मध्ये भाजपविरुद्ध विजय मिळवून दिला. 2017 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेससाठी, 2019 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेससाठी, 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसाठी, तामिळनाडूत डीएमकेसाठी त्यांनी काम केले होते.
राष्ट्रवादीकडून आगामी लोकसभा आणि विधानसभेची पूर्वतयारी
त्यांनी काम केलेल्या पक्षांना यश मिळवल्याने त्यांना एक चांगला आणि यशस्वी रणनितीकार म्हणून ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नाही, तरीही राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांना रणनितीकार म्हणून पक्षाचे काम का दिले आहे. तर हा निर्णय अत्यंत दूरगामी विचार करून घेण्यात आला आहे. सध्या तातडीने महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नसतील, तरीही ही पुढील लोकसभा आणि विधानसभेची पूर्वतयारी मानली जात आहे.












