Pune Sahakarnagar Firing : पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आज रात्री पुन्हा एक धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे. सहकारनगर परिसरातील शिंदे हायस्कूलजवळील एका मेडिकल दुकानाजवळ रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात योगेश मानेकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे सहकारनगरसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशी रात्री उशिरा घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस दल दाखल झाले असून, परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबान्या यावरून पोलिस तपास करत आहेत.
चार जणांनी मिळून हा गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती
पोलिस उपायुक्तांचे विधानपुणे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, “बिकानेर चौकात ही घटना घडली आहे. दोन राऊंड फायरिंग झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. चार जणांनी हे गोळीबार केल्याचे समजते. आम्ही सर्वोच्च प्राधान्याने तपास करत आहोत. जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना कोणत्याही टोळीयुद्धाशी संबंधित नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गोळीबार करणाऱ्या संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न
”पोलिसांनी सांगितले की, योगेश मानेकर हा स्थानिक तरुण असून, त्याच्यावर कोणतेही पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. फायरिंग करणाऱ्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. पुण्यात वाढते गुन्हेगेल्या काही दिवसांपासून पुणे शहर व जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाटसांमध्येही गोळीबार झाला होता, ज्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. या सर्व घटनांमुळे पुणे पोलिसांवर तणाव वाढला आहे. पोलिस आयुक्तालयाने शहरातील विविध भागांत पेट्रोलिंग आणि नाकाबंदी वाढवली आहे.
मुलं-बाळं घेऊन राहणाऱ्या कुटुंबांना भीती
स्थानिक नागरिकांनी मात्र पोलिस प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. “रात्री १० वाजता अशी घटना घडणे हे चिंताजनक आहे. मुलं-बाळं घेऊन राहणाऱ्या कुटुंबांना भीती वाटते,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयितांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेचा तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.












