Ajit Pawar Jayanti: अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “दादा…” म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आयुष्यातील मोठा आधार हरवल्याची भावना व्यक्त केली.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “दादा….एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर कुटूंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा… पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतूर पार तुटून जातंय.”
अजित पवार हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सर्वात मोठी ताकद होते, असे सांगतात सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ” तुमचा भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची थाप आणि मला दिलेली साथ… आज हे सगळं हरवून गेलं आहे. सगळं काही अचानक पोरकं झालंय, यावर अजून देखील विश्वासच बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
दादा…
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही… pic.twitter.com/GZ6sxbQdzO— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 22, 2026
काळाने आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असे कधीही वाटले नव्हते, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या जाण्याचे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“आज तुमचा जन्मदिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघत आहे. डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत,” असे म्हणत त्यांनी अजितदादांच्या आठवणींना भावनिक उजाळा दिला.
अजित पवार आज प्रत्यक्ष सोबत नसले तरी त्यांचे विचार, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त आणि त्यांनी दिलेले प्रेम कायम आपल्या आयुष्यात जिवंत राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. त्यांनी आपल्या आयुष्याच्या साथीदाराला आणि त्यांच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबीयांसह काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्मरण करत आदरांजली वाहिली. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आणि जनसेवेतील योगदानाची यावेळी आठवण करण्यात आली.
तसेच, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा.@Dev_Fadnavis pic.twitter.com/vApsi3k3cm— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 22, 2026









