MHT CET: CET मध्ये 99 पर्सेंटाइलची गॅरंटी आणि नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करणारी छत्रपती संभाजीनगरमधील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कथित क्लिपमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्वाच्या असलेल्या MHT-CET परीक्षेच्या निकालाबाबत एक धक्कादायक दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एका खासगी क्लास चालकाने विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाइल मिळवून देण्याची हमी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ठराविक परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास सांगून नामांकित सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे कथित संभाषण समोर आले आहे.
या प्रकरणामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात चिंता निर्माण झाली असून संबंधित विभागाकडून या कथित क्लिपची चौकशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: BoB खातेदारांनी त्वरित करा ‘ही’ 5 कामे, नाहीतर होऊ शकते फसवणूक
९९ पर्सेंटाइलची हमी दिल्याचा दावा
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये क्लास शिक्षक आणि एका विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये संवाद झाल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणात विद्यार्थ्याला ९९ पर्सेंटाइल मिळवून देण्याची हमी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
कथित क्लिपमध्ये संबंधित व्यक्ती पालकाला ठराविक परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्यास सांगत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत मदत करून हवे ते महाविद्यालय आणि शाखा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचेही म्हटले जात आहे.
12 ते 14 लाख रुपयांच्या व्यवहाराचा दावा
या कथित संभाषणात COEP, VJTI यांसारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कथित ऑडिओमध्ये सरकारी महाविद्यालयातील प्रवेशासाठी १२ ते १४ लाख रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रवेश निश्चित झाल्यानंतरच पैसे देण्याबाबत चर्चा झाल्याचेही या क्लिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
याच प्रकरणाशी संबंधित आणखी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा आणि क्लास चालकाचा तसेच विद्यार्थ्याच्या आईचा संवाद असल्याचे सांगितले जात आहे.
या कथित संभाषणात काही विशिष्ट परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पाठवले जाते आणि त्यानंतर टीमच्या माध्यमातून मदत केली जाते, असा दावा करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
MHT-CET सारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेबाबत अशा प्रकारच्या दाव्यांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप खरी आहे का, यामध्ये करण्यात आलेले दावे कितपत सत्य आहेत आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच स्पष्टता होणार आहे.








