Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 3.59 ला ‘तुकाराम’… 4 वाजता ‘तुकाराम सर’! एका मिनिटात आयुष्य बदललं; IAS तुकाराम मुंढेंचा प्रेरणादायी प्रवास
Top News

3.59 ला ‘तुकाराम’… 4 वाजता ‘तुकाराम सर’! एका मिनिटात आयुष्य बदललं; IAS तुकाराम मुंढेंचा प्रेरणादायी प्रवास

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe: ‘तुकाराम’ ते ‘तुकाराम सर’ या प्रवासाची कहाणी सांगताना IAS तुकाराम मुंढे यांनी तरुणांना मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचारांचा खास मंत्र दिला.

“नाव तेच होतं, माणूसही तोच होता… बदललं ते फक्त पद आणि लोकांचा दृष्टिकोन!” IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अमरावतीतील ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमात सांगितलेला हा अनुभव उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला. एका मिनिटात आयुष्य कसं बदलू शकतं, याचं जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या प्रवासातून दिलं.

“3.59 पर्यंत मी फक्त ‘तुकाराम’ होतो…”

मुंढे सांगतात, “5 मे 2005 रोजी दुपारी चार वाजता UPSC चा निकाल लागला. त्याआधी, म्हणजे 3 वाजून 59 मिनिटांपर्यंत माझ्यासोबत प्रशिक्षण घेणारे अधिकारी मला ‘तुकाराम’ (Tukaram Mundhe) म्हणूनच हाक मारायचे. पण निकाल जाहीर झाला आणि देशात 20 वा क्रमांक मिळाल्याचं समजलं. अवघ्या एका मिनिटात ती हाक ‘तुकाराम’वरून ‘तुकाराम सर’ अशी झाली.”

या एका प्रसंगातून त्यांनी समाजातील मानसिकतेवर भाष्य करत एक महत्त्वाचा संदेश दिला—पद बदललं की लोकांचा दृष्टिकोनही बदलतो; पण खरी ओळख तुमच्या कामातूनच निर्माण होते.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीची रक्कम लवकरच खात्यात; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

सलग अपयशानंतर मिळालेलं यश

IAS होण्याचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. 1997, 1998 आणि 1999 या सलग तीन वर्षांत ते UPSC मुलाखतीपर्यंत पोहोचले, मात्र अंतिम यश मिळालं नाही. या काळात त्यांनी नोकरी केली, अध्यापनही केलं. मात्र हार न मानता त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि 2005 मध्ये देशात 20 वा क्रमांक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

नियमांसमोर कोणताही तडजोड नाही

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची ओळख म्हणजे कठोर आणि तडफदार प्रशासकीय अधिकारी. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत ते कधीही मागे हटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्यांचीही चर्चा कायम राहिली.

लोक त्यांना विचारतात, “पाण्यात राहून मगरीशी वैर का?” यावर त्यांचं उत्तरही तितकंच स्पष्ट असतं.

“माझं कुणाशी वैर नाही. मी व्यवस्थेच्या विरोधात नाही. पण व्यवस्था योग्य दिशेने चालली आहे का, हे पाहणं माझं कर्तव्य आहे. प्रवाहात वाहणाऱ्या ओंडक्यासारखं जगण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्या माश्यासारखं जगा. ओंडक्याला स्वतःचं अस्तित्व नसतं; माशाला असतं.”

बैठकीत चहालाही नकार

मुंढे यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा आणखी एक किस्सा अमरावतीत घडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील दीर्घ बैठकीदरम्यान चहा आणण्यात आला. मात्र त्यांनी तो परत पाठवत स्पष्ट सांगितलं,

“ज्याला चहा घ्यायचा असेल त्याने बैठकीबाहेर जाऊन घ्यावा. मी इथे चहापानासाठी आलेलो नाही.”

या एका वाक्याने संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.

तरुणांसाठी दिलेले मोलाचे संदेश

कार्यक्रमात त्यांनी आजच्या तरुण पिढीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवरही भाष्य केलं. त्यांच्या मते, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक तरुणांना तुलना, न्यूनगंड आणि मानसिक तणावाकडे ढकलत आहे.

त्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे विचार:

यश एका दिवसात मिळत नाही; त्यामागे अनेक अपयश दडलेले असतात.
AI आणि तंत्रज्ञानाचा वापर करा, पण विचार करण्याची क्षमता गमावू नका.
मोठा पगार, बंगला किंवा गाडी म्हणजे यश नव्हे; समाजाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं हेच खरं यश.
लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही; जागरूक नागरिक होणं तितकंच महत्त्वाचं आहे.
एका भाषणाने बदललं एका विद्यार्थिनीचं आयुष्य

2005 मध्ये UPSC मध्ये यश मिळाल्यानंतर मुंढे अमरावतीत भाषणासाठी गेले होते. त्या वेळी चौथी-पाचवीत शिकणारी एक विद्यार्थिनी त्यांचं भाषण ऐकत होती. त्या प्रेरणेतून तिने UPSC करण्याचा निर्धार केला आणि पुढे जाऊन IRS अधिकारी बनली.

विशेष म्हणजे, या यशाचं श्रेय स्वतःकडे न घेता मुंढे म्हणाले,

“हे यश माझ्यामुळे नाही; त्या मुलीच्या मेहनतीमुळे आणि तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे मिळालं.”

यशाची खरी व्याख्या

तुकाराम मुंढे यांच्या मते, पैसा हा आयुष्याची गरज असू शकतो; पण तोच यशाचा अंतिम मापदंड नाही. वाचन, लेखन, चिंतन आणि समाजाशी संवाद हीच व्यक्तिमत्त्व घडवणारी खरी साधनं आहेत.

त्यांनी शेवटी तरुणांना एक विचार करायला भाग पाडणारा प्रश्न विचारला—

“तुम्हाला प्रवाहासोबत वाहून जाणारा ओंडका व्हायचं आहे की प्रवाहाच्या विरोधात पोहणारा मासा?”

हा प्रश्न केवळ करिअरबद्दल नाही, तर आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts