E20 Petrol: E20 इथेनॉल- मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने ही या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत E २० इंधनासह बेरोजगारी, शिक्षण आणि युवकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे.
छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar) बजाजनगर परिसरात CJP चे संस्थापक अभिजित दिपके (Cockroach Janata Party) यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. देशभरातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी दाखल झाले असून, E २० इंधनाबाबत जनतेच्या तक्रारी आणि त्यावरील पुढील भूमिका यावर विचारमंथन केले जात आहे.
हेही वाचा: ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे की ठाकरे गटाकडे राहणार चिन्ह?
राजकीय पक्ष नव्हे, दबावगट म्हणून काम करण्याची भूमिका
अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले की, CJP सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात नसून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा दबावगट म्हणून काम करणार आहे. सोशल मीडियावर नवीन पक्ष स्थापन करण्याची मागणी होत असली तरी सध्याची गरज प्रभावी लोकचळवळीची असल्याचे त्यांनी सांगितले.
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनालाही पाठिंबा
बैठकीत झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला CJP ने पाठिंबा दर्शवला असून, गरज भासल्यास प्रत्यक्ष सहभागी होण्याची तयारीही व्यक्त केली आहे.
E20 इंधनावर चर्चा का वाढली?
E20 इंधनाच्या वापरामुळे काही वाहनधारकांकडून मायलेज कमी होणे, इंजिनच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न आणि इतर तांत्रिक अडचणींचे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि काही राजकीय नेत्यांनी सरकारकडे या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, E20 इंधनाबाबतची चर्चा आणि विविध संघटनांची भूमिका यामुळे हा मुद्दा आगामी काळात आणखी चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









