Shehnaaz Gill: ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलसोबत शूटिंगदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. तिची नोज रिंग चुकून घशात अडकली, मात्र त्रास होत असतानाही तिने शूटिंग थांबवलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
‘बिग बॉस १३’ मधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या कामामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर शहनाजने नुकताच शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेला एक विचित्र प्रसंग पाहायला मिळत आहे.
शहनाजच्या एका सीनदरम्यान तिची नोज रिंग अचानक घशात अडकली. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात खोकला आला आणि ती अस्वस्थ झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. घशात अडकलेली नोज रिंग बाहेर काढण्यासाठी ती प्रयत्न करताना दिसते. यावेळी तिचा सहकलाकार सौरभ सचदेवानेही तिला मदत केली.
नोज रिंग अडकल्यानंतरही शूटिंग पूर्ण
हा प्रकार तिच्या ‘इश्कनामा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडल्याचं शहनाजने सांगितलं आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतरही तिने शूटिंग थांबवलं नाही. त्रास होत असतानाही तिने आपला सीन पूर्ण केल्याचं व्हिडीओमधून समोर आलं आहे.
शहनाजने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत या घटनेमागची छोटीशी ‘बिहाइंड द सीन’ गोष्ट सांगितली. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मात्र तिच्या आरोग्याची चिंता वाटू लागली.
View this post on Instagram
चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला
व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी शहनाजला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. काम महत्त्वाचं असलं तरी स्वतःच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचं आवाहन काही नेटकऱ्यांनी केलं.
दरम्यान, शहनाज गिल ‘बिग बॉस 13’मुळे विशेष लोकप्रिय झाली. या शोदरम्यान तिची दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतची मैत्री चर्चेत राहिली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने स्वतःला कामात व्यस्त ठेवलं. आता तिचं नाव अभिनेता आणि डान्सर राघव जुयालसोबत जोडलं जात असल्याच्या चर्चाही मनोरंजनविश्वात सुरू आहे.



