Ghatkopar Landslide: मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी पहाटे भूस्खलनाची मोठी घटना घडली. डोंगराचा मोठा भाग चाळींवर कोसळल्याने काही झोपड्या मलब्याखाली दबल्या गेल्या.
मुंबईत बुधवारी पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर परिसरातील गौसिया चाळीत (Ghatkopar Landslide) नागरिक झोपेत असताना अचानक डोंगराचा काही भाग खाली आला. माती, दगड आणि मलब्याचा मोठा ढिगारा थेट चाळीतील काही झोपड्यांवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. भूस्खलनामुळे जवळपास ६ ते ७ झोपड्या मलब्याखाली आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटना अचानक घडल्याने झोपेत असलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. काही नागरिकांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले असून, आणखी कोणी ढिगाऱ्याखाली अडकले आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई (Mumbai Landslide) अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन आणि NDRFची पथके घटनास्थळी पोहोचली. बचाव पथकांकडून मलबा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने मोठी यंत्रसामग्री पोहोचवताना काही अडचणी निर्माण झाल्या. (Ghatkopar Landslide)
प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, भूस्खलनाचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. Mumbai breaking new
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोकादायक उतार आणि डोंगरालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाकडून परिसराची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. ( Ghatkopar News)









