Mumbai Bhandup Incident: मुंबईतील भांडुप परिसरात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय नवविवाहितेने १० व्या मजल्यावरून उडी मारली, मात्र पुढे जे घडलं धक्कादायक होते.
मुंबईतील भांडुप परिसरात बुधवारी एका धक्कादायक घटना घडली. २६ वर्षीय नवविवाहित महिलेने इमारतीच्या १० व्य मजल्यावरून खाली उडी घेतली. मात्र खाली असलेल्या झाडावर ती अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा: श्रावण शुक्रवार अन् रक्षाबंधन एकाच दिवशी! लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करा ‘हे’ 3 खास उपाय
झाडावर अडकल्याने वाचला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी संबंधित महिला १० व्या मजल्यावरील खिडकीजवळ होती. याचदरम्यान तिने खाली उडी घेतली. मात्र इमारतीखाली असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये ती अडकली. त्यामुळे थेट जमिनीवर पडण्याचा धोका टाळला आणि तिचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांनी महिलेला झाडावरून सुरक्षितपणे खाली उतरवलं.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
महिलेला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेत तिच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
उडी घेण्यामागचं कारण काय?
या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिला सध्या उपचार घेत असल्याने पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आलेला नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिचं स्टेटमेंट नोंदवलं जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लग्न कधी झालं होत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यामुळे या घटनेने तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
मात्र तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यामागे कौटुंबिक, वैयक्तिक किंवा अन्य कोणतं कारण होतं का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महिलेचा जबाब नोंदवल्यानंतरच या घटनेमागचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





