Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 12 गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
गुन्हा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 12 गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Pune Police Action
44
Pune Police Action: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी कारवाई केली आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 12 गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहरातून तडीपार करण्यात आलं आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांकडून कलम 56 अन्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे संबंधित गुन्हेगारांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे उत्सवादरम्यान संवेदनशील भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.

तडीपार करण्यात आलेल्या 12 गुन्हेगारांमध्ये पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्हेगाराचा समावेश आहे.

हेही वाचा: पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू; कात्रजमध्ये खळबळ

पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक गायकवाड, चेतन भालेराव आणि भीमा शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंक्य काळे, सरफराज उर्फ डर समीर शेख आणि महेश उर्फ बंटी विनायक निम्हण यांना तडीपार करण्यात आलं आहे.

तसंच, बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केतन टेमकर आणि खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे, तर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र उर्फ मोन्या संजय लोंढे आणि रोहन रोंगे यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेश उर्फ नब्बा सचिन दिवटे आणि आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र शिंदे यांचाही तडीपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिला जात आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts